शरद पवारांचे विचार पुढे न्यायचे आहेत की बाळासाहेबांचे? रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सोडला बाण | पुढारी

शरद पवारांचे विचार पुढे न्यायचे आहेत की बाळासाहेबांचे? रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सोडला बाण

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : उठायचं अन् गद्दार म्हणायचे… असा प्रकार सध्या सुरू असून, गद्दारीची नेमकी व्याख्या उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावी. शिल्लक राहिलेले गद्दार आहेत, की मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आमदार गद्दार आहेत? हे का झालं, कशामुळे घडलं याचा विचार करणार की नाही? पक्ष वाचविणार की नाही? बाळासाहेबांचे विचार वाचविणार की नाही? की आपल्याला शरद पवारांचेच विचार पुढे घेऊन जायचे आहे, असे शाब्दिक बाण माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सोडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानिमित्त आलेल्या रामदास कदम यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील एकूण वातावरण गढूळ कोणी केले, त्यांच्या पाठीमागे नेमका कोण आहे. उद्धव ठाकरे यांच्या आसपास काही बडवे जमा झाले आहेत. संजय राऊत शिवसेनेचे नाहीत ते शरद पवारांचे आहेत, असा दावाही त्यांनी केला. मी हे प्रचंड अभ्यासाने बोलतोय. गद्दार, बैल, वाट्टेल ते बोलतात. आपण काय बोलतोय, दिवसभर आपण चॅनलवर बोलतोय, उचलली जीभ लावली टाळ्याला असे म्हणत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला. ही बाळासाहेबांची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले.

आमदारांवर, कार्यकर्त्यांवर, माझ्या मुलावर अन्याय होत होता. खेडच्या मनसेचा नगराध्यक्ष, तो राष्ट्रवादीचे काम करतो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली, जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत दोषी असतानाही त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, त्याच्यावर कारवाई करू नका, असे उध्दव ठाकरेंनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती घेतली असता, शरद पवार यांनी शब्द दिल्याने कारवाई झाली नसल्याचे मला समजले. शरद पवार आपल्या पक्षाच्या मुळावर उठलेत, त्याचे तुम्ही ऐकताय, याचे दु:ख आहे, असेही ते म्‍हणाले.

नगरपरिषद निवडणुकीत दापोलीतील मतदार माझा मुलगा योगेशच्या मागे राहिले. मात्र अनिल परबने ही नगर परिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम केले, असा आरोप करत, कोण शिवसेना संपवतोय, कोण गद्दार आहे, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला.

सुभाष देसाई शेळी….

अर्जुन खोतकर यांच्याविषयी त्यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, भाई मी मतदारसंघात जातोय, माझ्या लोकांशी बोलून मी निर्णय घेणार आहे, एवढेच खोतकर यांनी मला सांगितले. ते मीडियात काय बोलले, मला माहीत नाही. भेटल्यावर मी त्याला विचारेन. तो इतका घाबरट कधीपासून झाला. त्याने पैसे खाल्ले का म्हणून तो घाबरत आहे. असं बोलणं चुकीचं आहे. मी त्याला वाघ समजतो. तो सुभाष देसाईसारखं शेळी कधी झाला, असा टोलाही कदम यांनी देसाईंना लगावला. संजय राऊतांच्या ईडी चौकशीबाबत ते म्हणाले, खुलेआम त्यांनी सामोरे जावे, पण भविष्यात शिवसेनासोडून अन्य कोणाची भांडी घासू नका, शिवसेनेला संपवण्याचे पाप करू नका, अशी त्यांना विनंती असल्याचे कदम हात जोडून म्हणाले.

हेही वाचा

Back to top button