रत्नागिरी : स्तनदा मातेला देण्यात आलेल्या धान्यात सापडली मृत पाल; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार | पुढारी

रत्नागिरी : स्तनदा मातेला देण्यात आलेल्या धान्यात सापडली मृत पाल; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तोणदे- भंडारवाडी येथील अंगणवाडीत स्तनदा मातांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराच्या धान्यामध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. लाभार्थीनेच ही माहिती कळवल्यामुळे ठेकेदाराबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी यात लक्ष घातले असून याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत स्तनदा मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून धान्य पुरवठा केला जातो. शासनाने नेमलेला ठेकेदार हा अंगणवाड्यांना धान्य पुरवत असतो. या धान्यांबद्दल अनेकदा तक्रारी होत असतात. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.

या अंगणवाडीला ज्या ठेकेदार व पुरवठादाराने धान्याचा पुरवठा केला आहे. त्यांचा ठेका रद्द करून यातील दोषींवर कारवाई करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी यात लक्ष घालावे. ग्रामीण भागामध्ये अजून गावागावांत निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवले जात आहे. प्रशासकीय अधिकारी याची कोणतीही दखल घेत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचेही पटवर्धन यांनी सांगितले. एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणारे सर्व अधिकारी, ठेका देणारे, कंपनीचे अधिकारी, बिले काढणारे अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button