संजय रायमूलकरांचा राजकीय ‘वनवास’ संपणार; मंत्रीपदाची अपेक्षा | पुढारी

संजय रायमूलकरांचा राजकीय 'वनवास' संपणार; मंत्रीपदाची अपेक्षा

बुलडाणा; विजय देशमुख: “फिरेल फाळ तर फिटेल काळ” ही अशी प्रचलित म्हण शिंदे गटाचे शिवसेना आमदार मेहकरचे डॉ. संजय रायमूलकर यांच्याबाबतीत अचूक लागू पडू शकतो. शिवसेनेतील ‘भूकंपा’नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीने रायमूलकरांचा गत अडीच वर्षातील राजकिय ‘वनवास’ संपण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदारकीची तिसरी टर्म असलेल्या रायमूलकरांना यावेळी मंत्रीपद खुणावत आहे का? हे जाणून घेण्यापूर्वी थोडा विस्ताराने मागोवा घेऊया!

अडीच वर्षापूर्वी रायमूलकरांनी मंत्रीपदाचे स्वप्न पाहिले होते. परंतू ते स्वप्न पाहणे एका अर्थाने त्यांच्यासाठी जणू अपराधच ठरला होता, असे म्हणावे लागेल. रायमूलकरांच्या मंत्रीपदासाठी त्यांचे राजकीय गॉडफादर शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव यांनी ठाकरे मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधी बुलडाणा, अकोला, वाशिम या तीनही जिल्ह्यातून दोन खासदार, तीन आमदार, दोन विधानपरिषद सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुखांचे समर्थन मिळवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जोरदार लॉबींग केली होती.

तिस-या टर्मची आपली ज्येष्ठता, पश्चिम विदर्भातून पक्षाचे प्रतिनिधित्व आणि शिवसेना पदाधिका-यांचे भक्कम पाठबळ असल्याने आ.संजय रायमूलकरांनी मंत्रीपद मिळेलच असे गृहित धरले होते. संभाव्य शपथविधीसाठीचा पेहराव करून बोलावणे येण्याची प्रतिक्षा करीत चर्चगेटजवळील ‘रिट्ज’ हॉटेलवर ते थांबले होते. सोबतीला खा. प्रतापराव जाधव, बुलडाण्याचे नवखे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे ही होतेच. शपथविधीसाठी बोलावणे येण्याची या सर्वांचीच प्रतीक्षा शिगेला पोहचली होती.

हॉटेलच्या टीव्हीवर विस्तारित मंत्रीमंडळाची यादी झळकली. पण त्यात रायमूलकरांचे नाव नसल्याने त्यांना मोठा धक्का बसला. ऐनवेळी आदीत्य ठाकरेंचे नाव समाविष्ट झाल्यानेच आपला पत्ता कटला असा त्यांचा समज झाला. त्याचवेळी आणखी एक धक्का बसला. सिंदखेडराजाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले होते. जाधव -रायमूलकर गट आणि शिंगणे यांच्यात आधिच टोकाची राजकिय कटूता आहे. काही महिन्यापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणूकीत जाधवांनी शिंगणेंचा दुस-यांदा पराभव केला होता.

आपले कट्टर समर्थक रायमूलकर यांची संधी हुकणे आणी विरोधक शिंगणे हे मंत्री होणे हे खा. जाधवांसाठी दुहेरी दु:ख होते. मंत्रीपदाबाबत घोर निराशा झाल्याने रायमूलकर प्रचंड खचले होते. अखेर मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पाठ दाखवून खा. जाधव, आ. रायमूलकर, आ. गायकवाड हे तिघेही हॉटेलवरच थांबल्याने त्यांची तीव्र नाराजी उघड झाली होती. मुंबईत हजर असूनही या तिघांनी विस्तारित मंत्रीमंडळाच्या विशेषतः आदित्य ठाकरेंच्या शपथविधीवर बहिष्कार टाकण्याच्या त्या धाडसाची (बुलडाणा पॅटर्नची) शिवसेना वर्तुळात त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

पुढे परिणाम असा झाला की, ठाकरे परिवाराने रूसव्याच्या ‘त्या’ घटनेची खुणगाठ (अढी)मनात ठेवली असावी असे आ. रायमूलकर व आ. गायकवाडांना पुढे वेळोवेळी जाणवू लागले. मुख्यमंत्र्यांनी फोन न घेणे, भेटीची वेळ न मिळणे, पत्रांना उत्तरे न येणे असे अनुभव सातत्याने येऊ लागले. स्वपक्षाचे सरकार असूनही आ.रायमूलकरांना लोकांच्या छोट्या छोट्या कामांसाठी आंदोलने, उपोषणे करावी लागली. यातूनच मतदारसंघात आणि प्रशासनातही चुकीचा संदेश जाऊ लागला. मंत्रीपदाने हूलकावणी दिल्यामुळे त्यावेळी दाखवलेला रूसवा अंगलट आला होता. एकूणच झालेल्या कोंडीने आ. रायमूलकर हताश झाले होते.

जलसमाधी आंदोलन

वानगीदाखल हे एक उदाहरण पुरेसे बोलके आहे. पेनटाकळी जलसंपदा प्रकल्पाचा कालवा पाझरल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे कालव्याची लिकेज दुरूस्ती करून शेतीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतू, (राष्ट्रवादीच्या) जलसंपदा मंत्र्यांनी मागणीला प्रतिसाद दिला नव्हता. शिवसेनेचे सरकार असूनही आमदाराकडून लोकहिताची कामे होत नसल्याचे टोमणे आ.संजय रायमूलकरांना सतत ऐकावे लागत होते. अखेर निराश होऊन रायमूलकरांनी पेनटाकळी प्रकल्पात नावेतून उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे हे आंदोलन त्यावेळी खुप गाजले होते. स्वपक्षाचे सरकार असतांनाही शिवसेना आमदाराची अशी मुस्कटदाबी होत होती.

एकनाथ शिंदेंचा दिलासा

आ. रायमूलकर वाहनाच्या एका जीवघेण्या अपघातातून वाचले. छातीची हाडे फ्रॅक्चर झाल्याने ते काही महिने मुंबईत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. या काळात ठाकरे परिवारातील कुणीही त्यांच्या प्रकृतीची साधी विचारपूसही केली नाही. दरम्यान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायमूलकरांना अधूनमधून भेटून दिलासा देत, त्यांचे हॉस्पिटलच्या उपचाराचे बील भरून संवेदनशिलता दाखवली होती. अलिकडेच तीन महिण्यापूर्वी रायमूलकरांच्या कन्येच्या विवाहासाठी एकनाथ शिंदे मेहकरला हेलिक्रॉफ्टरने आले होते. मात्र ठाकरे परिवाराने या लग्नाची दखलही घेतली नव्हती. शिवसेना आमदारांच्या सुखदु:खात सहभागी होऊन, त्यांची मने जिंकण्याचे कसब साधल्यानेच शिंदे यांच्या एका हाकेसरशी शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने धावले आणि ‘भूकंप’ झाला.

एकनाथ शिंदे-फडणवीसांच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार

विदर्भातील 11 जिल्ह्यांच्या आणि 62 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे केवळ चार आमदार आहेत. संजय राठोड (दिग्रस जि. यवतमाळ), संजय रायमूलकर (मेहकर जि. बुलडाणा), संजय गायकवाड (बुलडाणा) आणि नितीन देशमुख (बाळापूर, जि. अकोला) यामध्ये आ. देशमुख वगळता अन्य तीन आमदार शिंदे गटाचे आहेत. शिवसेनेची पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ या तीन जिल्ह्यात किमान जेमतेम ताकद आहे. अन्य ८ जिल्ह्यांत तर शिवसेनेचा एकही आमदार नाही. असे चित्र असूनही पक्ष वाढीसाठी (मंत्रीपद नेमावे याकडे) नेतृत्वाने कधी लक्ष दिले नव्हते. पुण्यातील एका बहूचर्चित प्रकरणामुळे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. तेव्हापासून ते मंत्रीपद दीर्घकाळ रिक्त राहीले. अख्ख्या विदर्भातून शिवसेनेचा एकही मंत्री नसल्याने रिक्त झालेल्या मंत्रीपदावर वर्णी लागणे आ. रायमूलकरांना अपेक्षित होते. परंतू पक्षनेतृत्वाकडून अनास्थेची वागणूक मिळत असल्याने, त्यांनी नंतर कधी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली नाही.

Back to top button