राहुरी : ‘मुळा’च्या पाणलोटात आषाढ सरींची कृपा | पुढारी

राहुरी : ‘मुळा’च्या पाणलोटात आषाढ सरींची कृपा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर आषाढी सरींची कृपा झाल्याने पाणी आवकेचा श्रीगणेशा झाला आहे. पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाकडे नवीन पाण्याची आवक होत होती. धरणामध्ये नव्याने पाणी जमा होत आहे. परंतु, मान्सून पूर्व पावसाने अवकृपा दाखविल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही.

मुळा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी 6 वाजता 8521 दलघफूट इतका होता, तर आवक 1521 क्युसेकने येत होती. दिवसभरात 300 दलघफू पाणीसाठा इतका वाढला. गुरुवारी रात्री 9 वाजता मुळा धरणाकडे 6 हजार क्युसेकने आवक झाली होती. शुक्रवारी सकाळी 2 हजार 829 क्युसेकने आवक होत होती. दुपारपर्यंत आवकेत घट होऊन नवीन पाणी येण्याचा प्रवाह घटला होता. त्यामुळे दुपारी 1 हजार 800 क्युसेकने नवीन पाणी दुपारच्या वेळी जमा होते.

पाणीसाठा 8 हजार 500 दलघफू इतका झाला आहे. आलेल्या पाण्यामुळे धरणामध्ये केवळ 250 दलघफू इतके पाणी वाढले आहे. मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरविल्यानंतर मान्सूननेही दडी मारली होती. परंतु, आषाढ सरींची मुळा पाणलोट क्षेत्रावर कृपा झाली. मागील वर्षी धरणाचा पाणीसाठा अधिक होता. जुलै महिन्यात 9 हजार 233 दलघफू इतका पाणी साठा होता, तर धरणाकडे त्यावेळी मान्सून पूर्व पावसामुळे मागील वर्षी पाण्याची आवक होत होती.

परंतु, यंदा पावसाने अपेक्षित कृपा केलेली नाही. आषाढ सरींचा वर्षाव सुरू झाला आहे. दैनंदिन कोसळणार्‍या आषाढ सरींमुळे मुळा धरणाचे उर्ध्व पात्रात पाणी जमा करणारी मुळा नदी पिंपळगाव खांड धरण भरल्यानंतर दुथडी भरून वाहू लागली आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या हरिश्चंद्रगड, पांजरे, कोतूळ परिसरात पावसाचा वर्षाव सुरूच आहे. याबाबत मुळाचे शाखा अभियंता शरद कांबळे यांनी सांगितले की, पाणलोट पावसाचा वर्षाव वाढल्याने आवकेत वाढ होणार आहे.

धरणाच्या पाणीसाठ्याकडे मुळा पाटबंधारे विभाग लक्ष देत आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा पाणीसाठा 1 हजार दलघफू इतका कमी आहे. परंतु, आषाढी सरींची कृपा कायम राहिल्यास धरण भरण्यासाठी मोलाची मदत होईल, असे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, राहुरी परिसरातही आषाढी सरी कोसळत असल्याचा लाभ शेतकर्‍यांना झाला आहे.

राहुरी परिसरात 16 हजार 120 हेक्टर क्षेत्रापैकी 14 हजार 683 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. 2 हजार 319 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. बाजरी 1 हजार 751 हेक्टर क्षेत्र, मका 948 हेक्टर क्षेत्र, सोयाबीन 2 हजार 418 हेक्टर क्षेत्र, भुईमूग 64 हेक्टर क्षेत्र, मूग 68 हेक्टर क्षेत्र, तर तूर 24.50 हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

‘जायकवाडी’ पाणलोटही संपूर्ण भरू दे..!’
गेली दोन वर्षे राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस कोसळल्याने सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाचा अडसर दूर होता. परंतु, समन्यायीची टांगती तलवार अजूनही उभीच असून मुळासह जायकवाडी धरणही भरू दे, अशी प्रार्थना बळीराजाकडून केली जात आहे.

Back to top button