शाब्‍बास… ‘खेलाे इंडिया’त महाराष्‍ट्राच्‍या मुलींचा डंका : अ‍ॅथलेटिक्समध्ये विजेतेपद | पुढारी

शाब्‍बास... 'खेलाे इंडिया'त महाराष्‍ट्राच्‍या मुलींचा डंका : अ‍ॅथलेटिक्समध्ये विजेतेपद

पंचकुला : पुढारी वृत्तसेवा

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. ४ × ४०० मीटर रिलेमध्ये मुलींनी सुवर्णपदक पटकावले. तसेच ४ × १०० मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदक घेतले. मुलींच्यासंघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण दुखापतीतून सावरत दुसऱ्या लेगला धावत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवली. तिच्‍यासह अन्‍य मुलींनी केलेल्‍या कामगिरीमुळे महाराष्‍ट्राने अ‍ॅथलेटिक्समध्ये विजेतेपदावर आपली माेहर उमटवली.

२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आज पुन्हा सुवर्णपदक उंचावले. दुसरी स्पर्धक अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले. मात्र मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हरियाणाच्या संघाने विजेतेपदकाचा चषकावर आपलं नाव काेरलं. मध्य प्रदेश आणि तामीळनाडूला उपविजेतेपद मिळाले.

काेल्‍हापूर, नाशिक, पुणे आणि मुंबईच्‍या मुलींनी मैदान गाजवले

मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. महाराष्‍ट्र मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ४ × ४०० मीटरमध्ये ४. ०२. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची हरियानात मान उंचावली. ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता.

सुदेष्‍णा आणि अवंतिकाने पटकावली वैयक्तिक तीन पदके

सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिक नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली. सुदेष्णाने १०० मीटर धावण्यात नोंदवलेली (११.७९ सेकंद) वेळ ही तिचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तिने २०० मीटरमध्ये २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवली. ४ × १०० मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदकवर आपलं नाव काेरलं . त्यात साक्षी चव्हाण (औरंगाबाद), सुदेष्णा शिवणकर (सातारा), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा रिलेचा संघ होता. मंगळवारी यांच्या संघाने मैदान गाजवले होते.

दुखापतीतून सावरत  साक्षी ‘धावली’, महाराष्‍ट्राची मान अभिमानाने उंचावली

मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.

हेही वाचलंत का ?

Back to top button