नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : भीषण उकाड्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याने देशात टोमॅटोच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. दक्षिण भारतात टोमॅटोचे दर ९० रुपयांपर्यंत तर उत्तर भारतात हे दर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. येत्या महिन्याभरात हे दर ८० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील घाऊक बाजारात टोमॅटोची ४० ते ८४ रुपये किलोप्रमाणे विक्री केली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी हे दर ३० ते ६० रुपये किलो एवढे होते. (Tomato Price Hike)
राजधानी दिल्लीत टोमॅटोचे घाऊक दर ४० ते ५० रुपये, भोपाळमध्ये ३० ते ४० रुपये, लखनौत ४० ते ५० रुपये तर मुंबईत ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहचले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत हे दर २० ते ३० रुपयांपर्यंत होते. दक्षिण तसेच पुर्व भारतात टोमॅटोचे दर वधारले आहे. कर्नाटकमधील शिमोगा येथे ८४ रुपये किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे. तर आंधप्रदेशच्या कुरनूल मध्ये ७९ रुपये, ओडिशातील कटक येथे ७५ रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे. (Tomato Price Hike)
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाजानूसार २०२१-२२ मध्ये २०३ लाख टोमॅटोचे उत्पादन येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०२०-२१ च्या २११ लाख टन पेक्षा हे प्रमाण कमी आहे. भीषण उकाड्यामुळे टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिल्लीतील बाजारात सध्या २० ते २५ ट्रक टोमॅटोची आवक होत आहे. पंरतु, मागणी पुर्ण करण्यासाठी ४० ट्रकची आवश्यकता असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत. (Tomato Price Hike)