बीजिंग, पुढारी ऑनलाईन : चीनमध्ये यावर्षी झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्लॅक बॉक्स डेटावरून असे दिसून आले की चायना इस्टर्न जेटचे विमान जाणूनबुजून उंचावरून खाली आणत ते क्रॅश करण्यात आले. वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या वृत्तानुसार, कॉकपिटमध्ये उपस्थित असणा-या एका व्यक्तीने जाणूनबुजून विमान क्रॅश केले आणि काही सेकंदातच विमानाचा चक्काचूर झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. गुआंगशी प्रांतात झालेल्या या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला होता. अहवालानुसार, विमान अपघाताचा प्राथमिक तपास करण्यात आला. या तपासानुसार उद्ध्वस्त झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या फ्लाइट डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.
चीनच्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या एका विमानाला 21 मार्च रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्सचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे बोलले जात होते, मात्र आता नवा खुलासा झाला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने मंगळवारी एका वृत्तात दावा केला आहे की हा अपघात अपघात नसून विमान जाणूनबुजून खाली पाडण्यात आले आहे. चिनी एजन्सींनी केलेल्या तपासणीत विमानात तांत्रिक दोष नसल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे विमान जाणूनबुजून खाली पाडण्यात आल्याच्या कयासात भर पडली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटले आहे की, 'घटनास्थळावरून मिळालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्समधून फ्लाइट डेटाच्या प्राथमिक तपास करण्यात आला. यात बोईंग 737-800 कॉकपिटमध्ये कोणीतरी जाणूनबुजून ते विमान पाडले. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासाबाबत आपल्या प्राथमिक अंदाजात ही माहिती दिली आहे. 21 मार्च रोजी कुनमिंगहून ग्वांगझूला जाणारे विमान कोसळले आणि 132 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये गेल्या 28 वर्षात पहिल्यांदाच एवढा भीषण विमान अपघात झाला आहे. चीन सरकारनेही या अपघातावर चिंता व्यक्त केली होती.
रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा हे चिनी एअरलाइन्सचे विमान वेगाने खाली येत होते तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रकांनी अनेक कॉल केले होते. यापैकी एकाही कॉलला वैमानिकांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे हे विमान जाणूनबुजून पाडण्यात आल्याची भीतीही वाढली आहे. विमान जाणूनबुजून पाडण्यात आले या दाव्याला पुष्टी देण्यासाठी तपासकर्ते सध्या पुरावे शोधत आहेत. आतापर्यंतचा तपास कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही.