औरंगाबाद : राणे, कृपाशंकर यांचा भ्रष्टाचार संपला का? आरोप लावणाऱ्या भाजपला पटोले यांचा सवाल | पुढारी

औरंगाबाद : राणे, कृपाशंकर यांचा भ्रष्टाचार संपला का? आरोप लावणाऱ्या भाजपला पटोले यांचा सवाल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथे आज रविवारी काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी पत्रकर परिषद घेतली. यावेळी ते म्‍हणाले, नारायण राणे, कृपाशंकर यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, आता त्यांच्या पक्षात गेले तर ते गंगेत न्हाले की दुधाने? तसेच त्यांचा भ्रष्टाचार संपला का?असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. आरोप लावायचे आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे, हा भाजपचा धंदा असल्याचे लोकांना कळायला लागले आहे असे म्हणाले.

तसेच, नाना पटोले म्हणाले, ईडीच्या कारवायांच्या माध्यमातून सुरू असलेले मनोरंजन आता लोकांना अपेक्षित नाही. लोकांचे कान आता बधिर झाले आहेत. जेवढे आरोप लावले त्यातील एकही आरोप सिद्ध झालेले नाही. मातोश्रीला बदनाम करून त्या माध्यमातून सरकार पाडण्याचा हा भाजपचा डाव आहे. त्यांनी हे सगळे मनोरंजन थांबवावे. सगळ्यांनी मिळून राज्याच्या विकासासाठी चर्चा केली पाहिजे. विधानसभेतही लोक कसे खोट बोलतात, हेच कळत नाही. त्‍यामूळे हा प्रकार बरोबर नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी फडणवीस यांच्या पेनड्राइव्ह बॉम्बवर दिली.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, आम्ही लोकांपर्यंत जावून, त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत जोडून डिजिटल सदस्य नोंदणी करत आहोत, काही पक्षांनी तर मिसकॉल करून जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखविले आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. सदस्य नोंदणीसाठी आता सगळेच कामाला लागले असून, राज्यात 50 लाखांच्यावर सदस्य नोंदणी होईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रेल्वे, बँका, एलआयसी, ऑइल कंपन्या, एअर इंडिया यासारखे 24 सार्वजनिक उपक्रम आतापर्यंत विकले आहेत. त्यावर कुणाचे नियंत्रण नसल्याने आता या कंपन्या भाववाढ करत आहे. या कंपन्या विकल्याने त्या नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. याची चिंता काँग्रेसला आहे. म्हणून देश वाचविण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही, ही भूमिका आम्ही मांडतोय, असे पटोले म्हणाले.

मुंबईत आमदारांना मोफत कायम घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत त्यांना विचारले असता, आम्हांला घरे नको, असे लिहून देणे त्‍यांनी सुरू केले आहे. घर घ्यायचे की नाही हे आमदारांनी ठरवायचे आहे, असे उत्तर पटोले यांनी दिले.

हेही वाचा  

Back to top button