

Ashok Kharat Case Nashik Acharya Tushar Bhosale Reaction: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःला धर्मगुरू आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून मिरवणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या हाती तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ लागले असून तपास सुरु आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खरात महिलांना विश्वासात घेऊन त्यांना गुंगीचे औषधं देत असे आणि त्यानंतर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करत असे. पुढे याच व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करत असे. या प्रकरणात बलात्काराचेही गंभीर आरोप असून अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. खरातचे काही राजकीय नेते आणि नामांकित व्यक्तींशी संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका व्हिडिओमध्ये चाकणकर खरातचे पाय धुताना दिसतात, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या त्याला गुरु म्हणून संबोधताना दिसत आहेत. यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आचार्य तुषार भोसले यांनी कठोर शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “अध्यात्माच्या नावाखाली चाललेला हा नंगानाच खपवून घेतला जाणार नाही. पवित्र मार्गाचा गैरवापर करून अशोक खरात आणि अण्णा गुंजाळसारख्या पाखंडी लोकांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे.”
भोसले यांनी पुढे सांगितलं की, अशा प्रकारच्या नराधमांना कोणत्याही प्रकारे पाठीशी घालू नये आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. “कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न न करता कायद्याने योग्य ती कारवाई होईल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे,” असंही त्यांनी ठामपणे म्हटलं.
या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, धर्म आणि आध्यात्माच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. आता पोलिस तपासातून आणखी काय उघड होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.