

साकत : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून शेती साहित्यासाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारांऐवजी रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने सुतारांचा व्यवसाय अडचणीत आला. ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धत कालबाह्य, तर रेडिमेड साहित्याकडे कल वाढला आहे.
पूर्वी ग्रामीण परिसरात बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. प्रत्येक खेडेगावात बारा बलुतेदार होते. बलुतेदार गावातील शेकर्यांना वर्षभर सेवा पुरवत असत. त्या मोबदल्यात त्यांना शेतकर्यांकडून मोबदला म्हणून धान्य मिळत होते; परंतु यांत्रिक युगाचा प्रारंभ झाल्यापासून शेतीमध्ये लागणार्या लाकडी अवजारांऐवजी कारखान्यातूनच रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध होत असल्याने सुतारांच्या व्यवसायावर पाणी पडले.
सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे नांगर, फन, गाडी, ज्यू, तिफण, रुमने आदी अवजारे, तर घरगुती साहित्यांत पलंग, टेबल, खुर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, आदी वस्तू तयार करत असे. घरगुती साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्याची शेतकरी सुताराकडे तासन तास जाऊन बसत.
सुतारही त्या शेकर्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे, त्या आकारात शेतीची अवजारे बनवून देत असत. सुताराने बनवलेल्या अवजारापासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंंबीयांची गरज भागवित असे, परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकाऊ असल्याने शेतकरी रेडिमेड अवजारांकडे आकर्षित झाला आहे. यामध्ये बैलगाडी, तिफन, औत शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी महत्त्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणार्यांवर कुर्हाड कोसळली आहे.