‘माझी वसुंधरा’ अभियानात नगर राज्यात अव्वल!

‘माझी वसुंधरा’ अभियानात नगर राज्यात अव्वल!

नगर : पुढारी वृत्तसेवा

माझी वसुंधरा अभियानात नगर जिल्ह्याने राज्यात अव्व्लस्थान पटकाविले आहे. नगर महापालिकेसह जिल्ह्यातील सोनई, मढी, वाघोली, मिरजगाव, गणोरे गावांनी पारितोषिके पटकावित सर्वोत्तम कामगिरी केली. जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान राबवताना भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती.

5 जुन 2021 पर्यावरण दिनापासुन माझी वसुंधरा अभियान टप्पा 2 हे अभियान सुरु झाले. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात जिल्हयातील 574 ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरावरुन 574 ग्रामपंचायतींपैकी 77 ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

त्यात शेवगाव तालुक्यातील वाघोली, अकोले तालुक्यातील गणोरे, पाथर्डी तालुक्यातील मढी, नेवासा तालुक्यातील सोनई आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीने राज्यात अव्व्ल क्रमांक मिळविला आहे. या गावाचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवारी (दि.5) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित मुंबईत होणार आहे

महापालिकेनेही पटकाविले पारितोषिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत सिटी गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या शहरांमध्ये नगर महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. महापालिकेने पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी ऊर्जा बचत करणारे पथदिवे, सौर ऊर्जा प्रकल्प, वृक्षगणना, पुरातन प्राचीन वृक्ष जतन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, उद्यान निर्मिती, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, भिंतीचे रंगकाम, सुशोभिकरण, इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देणे, चार्जिंगची व्यवस्था करणे या योजनांवर प्रभावी काम केले. नगरचे महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे यांना मुंबईच्या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news