मांजराची पिल्ली आली कोंबडीच्या पंखाखाली! | पुढारी

मांजराची पिल्ली आली कोंबडीच्या पंखाखाली!

नवी दिल्ली ः अनेक पशुपक्ष्यांमध्ये वात्सल्याची भावना दिसून येत असते. आता असाच एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका कोंबडीच्या पंखाखाली दडून बसलेल्या मांजराच्या दोन चिमुरड्या पिल्लांचा हा ‘क्यूट’ फोटो आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट ऐकून घाबरलेली ही पिल्ली अशी कोंबडीच्या आश्रयाला गेली होती!

असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की पशुपक्ष्यांची पिल्ली असोत किंवा लहान मुलं असोत, आपल्या आईच्या ऊबदार कुशीचा आसरा घेत असतात. या पिल्लांजवळ कदाचित त्यांची आई नसेल; पण कोंबडीच्या रूपातील ‘मावशी’ होती! तिने लगेचच आपल्या पिल्लांसारखेच या पिल्लांनाही आपल्या पंखाखाली घेतले. एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा फोटो लगेचच व्हायरल झाला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,

‘वादळावेळी भयभीत झालेल्या मांजराच्या पिल्लांची देखभाल करणारी कोंबडी’! हा फोटो नेमका कुठे क्लिक करण्यात आला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, या पोस्टला आतापर्यंत ट्विटरवर 68 हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि 8 हजारांपेक्षाही अधिक यूजर्सनी त्याला रिट्विट केले आहे. एका यूजरने म्हटले, मजबूत व्यक्ती कमजोर लोकांचे रक्षण करतो. माणसाने या पशुपक्ष्यांकडून बरेच काही शिकून घेण्यासारखे आहे!

Back to top button