

नगर : जागतिक योग दिनानिमित्त योग विद्या धामतर्फे आयोजित योग दिंडीत योग घोषणांनी सावेडी परिसर दुमदुमला. बालचमूसह योगसाधकांच्या प्रात्यक्षिकांनी नगरकरांना थक्क केले. वाडिया पार्क क्रीडा संकुलात योग सोहळा पार पडला.
नगरकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचे धडे गिरवले. योग विद्या धामतर्फे शहर व उपनगरात विविध कार्यक्रमातंर्गत रविवारी (दि. 19) सकाळी सावेडीतून योग दिंडी काढली. विविध चौकांमध्ये साधकांनी योगासनांचे अवघड प्रकार करून दाखवले. या साधकांची शारीरिक लवचिकता पाहून नगरकर अक्षरशः थक्क झाले.
योग शिक्षक अनिरूध्द भागवत संचालित योग चैतन्य संस्कार वर्गातील बालचमूंनी पतंगासन, चक्रासन, शीर्षासन, मयूरासन, बकासन, हलासनासह इतर आसनांची प्रात्यक्षिके दाखवली. जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, योगगुरू सागर पवार व देवा यांच्या हस्ते सोहळ्यास प्रारंभ झाला. सागर पवार व गौरी गोर यांनी सादर केलेला कपल योग, मुक्ता कुलकर्णी हिने कॅण्डल योगाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मने जिंकली.