नगर : महिला तलाठी लाचेच्या जाळ्यात

नगर : महिला तलाठी लाचेच्या जाळ्यात
Published on
Updated on

पारनेर/टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील तिखोल येथील तक्रारदाराच्या कुटुंबाची वारसाहक्काने नावे लावण्यासाठी महिला कामगार तलाठी लता एकनाथ निकाळजे यांना 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील किन्ही येथील तलाठी कार्यालयात मंगळवारी (दि.28) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तिखोल येथील 30 वर्षीय पुरुषाने याबाबत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या लाचप्रकरणी लता निकाळजे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पारनेर येथील तहसील कार्यालयात पोलिस पंचनाम्यासाठी आणले आहे.

तक्रारदार यांनी तिखोल येथील आजोबा व वडील यांच्या नावे असलेली शेतजमीन वारसा हक्काने तक्रारदार, त्यांची आजी, आई, भाऊ यांच्या नावे करुन त्यांच्या नावाची नोंद लावण्यासाठी अर्ज दिला होता. सदरची नोंद लावण्यासाठी तलाठी लता निकाळजे यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तलाठी निकाळजे यांना 1 हजार रुपये दिले होते. उर्वरित एक हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या पडताळणीमध्ये आरोपी निकाळजे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हरिश खेडकर, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, महिला पोलिस अंमलदार संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार हरुन शेख, राहुल डोळसे यांनी ही कारवाई केली.

नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक हरिश खेडकर, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news