पुढारी ऑनलाइन डेस्क : कोणत्याही आमदारावर जबरदस्ती नाही. सगळे मोकळेपणाने फिरत आहेत. उद्या मुंबईत पोहोचल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार असल्याने बहुमत चाचणीची चिंता नाही, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. ५० आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. आम्हाला कोणत्याही बहुमत चाचणीची चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टींमध्ये पास होऊ आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते आणि ते आमच्याकडे आहे," असे शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे महाविकास आघाडी सरकारसह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. फ्लोअर टेस्टसाठी एकनाथ शिंदे उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार आहेत. शिंदे गटाने आज गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्या मुबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणार आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. या जनतेच्या राज्याचा विकास करण्यासाठी, राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच हिदुत्वाचा मुद्दा बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेउन जात आहे. सर्व आमदार मोकळेपणाने फिरत आहेत कोणावरही जबरदस्ती नाही. आमच्याकडे दोन तृतियांश आमदार आहेत त्यामुळे फ्लोअर टेस्टची आम्हाला चिंता नाही असे शिंदे यावेळी म्हणाले.