पुणे : पोहताना हुल्लडबाजी बेतली जीवावर; तरुणाचा बुडून मृत्यू

पुणे : पोहताना हुल्लडबाजी बेतली जीवावर; तरुणाचा बुडून मृत्यू

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

खडकवासला धरणाच्या खोल पाण्यात उतरून मित्रांबरोबर हुल्लडबाजी करताना एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश नवनाथ नवले (वय 18, सध्या रा. बिबवेवाडी, पुणे) असे त्याचे नाव आहे. नवले याने पाण्यात उतरून काढलेला सेल्फी हा त्याचा शेवटचा ठरला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

दुर्घटनांचीमालिका सुरूच

खडकवासला धरण परिसरात पोहताना बुडून मृत्यू होण्याच्या दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणाखालील सांडव्याच्या डोहात पोहताना बुडून वारजे येथील दोन तरुण मृत्यू पावले होते. त्यानंतर रविवारी आणखी एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली. धरणात तसेच नदी, मुठा कालव्यात पोहण्यास मनाई आहे. तरीही सुटीच्या दिवशी शेकडो तरुण पोहण्यासाठी येथे दाखल होत आहेत. धरण परिसरात ठिकठिकाणी सुरक्षेचे फलकही लावले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत रविवारी खडकवासला धरणातील धोकादायक ठिकाणी योगेश व त्याचे मित्र पोहण्यासाठी उतरले होते. मित्रांसोबत हुल्लडबाजी करताना योगेश अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे घाबरून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला.

त्यावेळी हवेलीचे वाहतूक पोलिस विलास बांबळे, मकसूद सय्यद, होमगार्ड शांताराम राठोड, प्रवीण घुले व विजय भालेराव यांनी धरणतीरावर धाव घेतली. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी तातडीने अग्निशमन केंद्राला माहिती दिली. केंद्राचे सुजित पाटील, ओंकार इंगवले, पंकज माळी, योगेश मायनाळे, सूरज इंगवले व अक्षय काळे यांच्या पथकाने खोल पाण्यात शोध कार्य सुरू केले. काही वेळातच योगेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.

मयत योगेश नवले हा मूळचा राशिन (जि. अहमदनगर) येथील आहे. तो पुण्यातील रविवार पेठेतील एका दुकानात काम करत होता.रविवारी सुटी असल्याने योगेश हा आपल्या मित्रांसह खडकवासला धरणात पोहण्यासाठी आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news