कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुंभारी व नाटेगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अखेर श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. जल जीवन मिशन योजनेंतर्गत कुंभारी गावासाठी 9 कोटी 23 लाख तर नाटेगावला 1 कोटी 16 लाख रुपये निधी मिळाला आहे. दरम्यान, या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आ. काळे म्हणाले, मागील अडीच वर्षात विकासाचा अनुशेष भरून काढताना मतदार संघातील अनेक गावातील रस्ते, वीज, पाणी अशा प्रश्नांबरोबरच अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या. रस्त्यांचा विकास झाल्याने व पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या बहुतांश अडचणी दूर झाल्या, परंतु विकास कामांबरोबरच शिक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलविताना शाळा, महाविद्यालयांचे जाळे विणले. यातील एक शाळा म्हणजे कुंभारी येथील गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय. या विद्यालयाच्या उभारणीत व विस्तारीकरणात स्व. काळे यांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी आ. काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महंत उंडे महाराज यांनी कुंभारीच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयासाठी 21 हजार रुपयांची देणगी दिली.
कुंभारी व नाटेगावच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून मागील अनेक वर्षापासून महिलांची होणारी पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबणार असल्यामुळे दोनही नागरिकांनी विशेषत: महिला भगिनींनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले.
यावेळी महंत उंडे महाराज, पं. स. माजी उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, श्रावण आसने, बबनराव बढे, शिवाजीराव घुले, सरपंच प्रशांत घुले, उपसरपंच दिगंबर बढे, अण्णासाहेब बढे, रामराव साळुंके, वाल्मिक कबाडी, सतिश कदम, सुभाष बढे, रविंद्र चिने, अशोक वाघ, ललित निळकंठ, दिलीप ठाणगे, गिताराम ठाणगे, भाऊसाहेब कदम, दिनेश साळुंके, पैठणे सर, रमण गायकवाड, दिलीप कातोरे, वसंत घुले, आशिष थोरात, चांगदेव बढे, सोपान ठाणगे, यशवंत गायकवाड, पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता लाटे, वाघ, दिघे, सातपुते, बी.डी.ओ. रानमाळ, ग्रामसेवक भीमराज बागुल, ठेकेदार पी.के. काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
जसे ध्यान मंदिर महत्त्वाचे आहे, तसेच ज्ञान मंदिरे महत्त्वाची आहेत. स्व. काळे यांचा वारसा पुढे चालवून सुजान पिढी घडवायची आहे. त्यासाठी शाळांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. योगायोगाने रयतच्या उत्तर विभागाची जबाबदारी माझ्याकडे असल्याने मदत करण्यास तयार असल्याचे आमदार काळे म्हणाले.