शेवगाव हद्दीतील राज्यमार्गांचे रुंदीकरण ; केंद्राकडून 1.67 कोटींचा निधी

शेवगाव हद्दीतील राज्यमार्गांचे रुंदीकरण ; केंद्राकडून 1.67 कोटींचा निधी

शेवगाव तालुका : शेवगाव हद्दीतील 105 किलोमीटर राज्यमार्गाचे हायब्रीड न्युटी प्रकल्पातंर्गत रुंदीकरण होणार आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी केंद्र शासनाने 1 कोटी 67 लाख रुपये निधी दिला असून, वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या कामासाठी आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांचा विशेष पाठपुरावा सुरू आहे. महार्गापासून शेवगाव तालुका उपेक्षित राहिल्याने हायब्रीड न्युटी प्रकल्पातंर्गत शेवगाव तालुका सरहद्दीतील प्रमुख तीन राज्यमार्गांचे प्रकल्प तयार करणे व ते अंतिम करण्यास सल्लागार सेवा पुरविण्यासाठी केंद्र शासनाने 1 कोटी 67 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

यामुळे तिसगाव, मिरी, पैठण, नेवासा राज्यमार्गाचे रुंदीकरण होणार आहे. डिसेंबरअखेर हे रस्ते अर्थसंकल्पात घेण्याचा प्रयत्न चालू असून, या रस्त्यांची 10 मीटर रुंदी आहे. यामध्ये 8 मीटर डांबरीकरण व दोन्ही बाजूस दीड-दीड मीटर पेव्हिंग ब्लॉक, तर मुख्य गावात काँक्रिटीकरण, साईट गटार, आवश्यक तेथे पुलाचे रुंदीकरण, असा आराखडा तयार केला जाणार आहे. एकून 133 किलोमीटरपैकी शेवगाव हद्दीत 105 किलोमीटर, पाथर्डी हद्दीत 12 किलोमीटर व राहुरी तालुक्यात 18 किलोमीटर रस्ते होणार आहेत.

राज्यमार्ग 8 ते वांबोरी, खोसपुरी, मिरी, माका, शेवगाव रस्ता राज्यमार्ग 52 अशा 42 किलोमीटरसाठी 53 लाख 25 हजार, राष्ट्रीय मार्ग 222 पासून तिसगाव अमरापूर, शेवगाव पैठण, अंबड, पिंपळगाव, पाथरी, नांदेड, धर्माबाद रस्ता राज्यमार्ग 61 अशा 41 किलोमीटरसाठी 52 लाख 25 हजार, शहापूर संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, माजलगाव, पाथरी पुर्णा, नांदेड, मुखेड, धर्माबाद रस्ता राज्यमार्ग 50 साठी 61 लाख 50 हजार रुपये, असे तीन राज्यमार्ग प्रकल्प तयार करण्यास एकून 1 कोटी 67 लाख रूपयांचा निधी केंद्र शासनाने दिला आहे. सदर प्रकल्प शासनाला सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.

मध्यतंरी सदर राज्यमार्ग केंद्राकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरु होत्या. हे महामार्ग होऊन रस्त्याबरोबर दळणवळणाची मोठी सुविधा निर्माण होण्याची अपेक्षा होती. मात्र, यात सतत बदल होत गेल्याने अथवा त्यांचे मार्ग बदलल्याने शेवगाव शहरासह तालुका महामार्गाला मुकला गेला आणि अपेक्षित छत्रपती संभाजीनगर ते पैठण, शेवगाव, तिसगाव, नगर हा एक्सप्रेस हायवे वेगळ्या दिशेने गेला आहे. अगोदर नेवासा, शेवगाव, गेवराई, पांढरीपूल, मिरी हे रस्ते एशियन डेव्हलपमेंट बँक प्रकल्पातून करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, कोरोना काळात तो बारगळला गेला.

यामुळे अगदी खडखड झालेल्या राज्यमार्गाची दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नसल्याने आमदार राजळे यांनी तालुका हद्दीत आवश्यक तेथे राज्यमार्ग दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला. यामध्ये शेवगाव ते तिसगाव 6 कोटी 75 लाख, नेवासा शेवगाव दत्तपाटी ते नित्यसेवा 7 कोटी 25 लाख, नित्यसेवा ते बोधगाव 8 कोटी 75 लाख, शेवगाव पैठण रस्ता 5 कोटी 25 लाख, मिरी शेवगाव रस्ता 5 कोटी 55 लाख असे 33 कोटी 55 लाख रूपये निधीतून खडखड रस्ते दुरुस्तीचे काम चालु आहे. नित्यसेवा बोधेगाव, शेवगाव पैठण, नेवासा शेवगाव रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली, तर अमरापूर शेवगाव रस्ता अपूर्ण स्थितीत आहे.

लवकर रस्ते होणे आवश्यक
काही राज्यमार्ग दुरुस्त झाले असले तरी त्यांचे भाग पाडण्यात आल्याने, राहिलेला रस्ता खड्डेमय झाला आहे. तसेच, काही ठिकाणी दुरूस्ती होऊनही पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने लवकरात लवकर हायब्रीड न्युटी प्रकल्पातून रस्ते होणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news