राज्य मंत्रिमंडळाचा येत्या आठ-दहा दिवसांत विस्तार

State Cabinet Meeting
State Cabinet Meeting

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठ ते दहा दिवसांत होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कोणते नेते सामील होतात याबाबत उत्सुकता आहे.

शनिवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शहा यांची जे. डब्ल्यू. मेरिएट हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी या चारही नेत्यांची सुमारे पाऊण तास चर्चा झाली. राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा शहा यांनी घेतानाच मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही हिरवा कंदील दाखविला. सध्या मंत्रिमंडळात शिंदे गट आणि भाजपचे प्रत्येकी 10 मंत्री आहेत. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री असे एकूण 29 मंत्री आहेत. अजूनही मंत्रिमंडळातील 14 जागा रिक्त आहेत. त्यापैकी दोन तीन जागा रिक्त ठेऊन दहा ते अकरा जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले होते.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे 40 आमदार आले आहेत. मात्र, जयंत पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यासारख्या काही बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी अंतर्गत चर्चाही सुरू आहे. त्याला या नेत्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांचा समावेश होऊ शकतो. शिंदे गट आणि भाजपमध्येही मंत्रिपदाचे अनेक दावेदार असून त्यांच्यात लॉबिंग सुरू होणार आहे. शिंदे गटात भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू आदींनी आधीच मंत्रीपदावर दावा सांगितला आहे. तर भाजपमध्ये संजय कुटे, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, किसन कथोरे आदी अनेक दावेदार आहेत.

विस्तार करू नका – बच्चू कडू

दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक असून सर्वांचा समावेश करणे शक्य होणार नाही. अशावेळी विस्तार करून नाराजीला आमंत्रण देऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news