

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुळधरण परिसरातील अनेक चार्या व पोटचार्यांना अद्याप कुकडीचे पाणी सोडले नाही, ते तत्काळ सोडावे, यासाठी कर्जत-श्रीगोंदा रस्त्यावर कुळधरण येथे संतप्त शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गुंड, शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रिक, अशोक जगताप, भाजप किसान आघाडीचे राहुल निंभोरे, गणेश जंजिरे, राहुल सुपेकर, बाळासाहेब काळे, अल्लाउद्दिन शेख, सुरेश जायभाय, बाळासाहेब सोलंकर, समीर पाटील, अमित पाटील, सचिन शिंदे, किसन शिंदे, गणपत शिंदे, लक्ष्मण कोपनर, देवीदास कोपनर, बंडू कोपनर, जयसिंग देवकाते, संजय कोपनर, बापू मस्के, राजेंद्र शेळके, ज्योतीराम शेळके, अशोक कोपनर, राजेंद्र कोपनर, गणेश पवार सहभागी झाले होते.
कोपनर म्हणाले, की कुळधरण परिसरातील चार्या व उपचार्यांना कुकडीच्या आवर्तनामध्ये टेलपर्यंत पाणी मिळाले नाही. या परिसरात पाऊसही पडला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांना व जनावरांना पिण्यास पाणी नाही, खरीप पिके पावसाअभावी वाया चालली आहेत. कुकडीचे आवर्तन सुरू आहे, मात्र, या परिसरातील सर्व शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अतिशय कमी वेळेत सांगूनही आज मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कुकडीचे पाणी मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही.
कैलास शेवाळे म्हणाले, की संघर्ष केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. त्यामुळे आता शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सरकारने सर्व चार्या व उपचार्यांना पुरेसे पाणी दिले तर जेलभरो आंदोलन करू.
राजेंद्र गुंड म्हणाले, की कुकडीच्या पाण्यासाठी कुळधरण परिसरातील सर्व गावे, वाड्यावर अन्याय झाला आहे.
कमी दाबाने पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांवर अन्याय झाला आहे. शेतकर्यांना पाणी देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकार्यांना आंदोलकांनी निवेदन दिले. दोन सप्टेंबरपर्यंत योग्य निर्णय घेऊन परिसरातील शेतकर्यांना पाणी दिले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
हेही वाचा