श्रीगोंदा : अन्यथा विसापूर धरणात जलसमाधी; पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाला इशारा

श्रीगोंदा : अन्यथा विसापूर धरणात जलसमाधी; पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाला इशारा

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जलसंपदा विभागाने शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजेपर्यंत विसापूर धरणात पाणी न सोडल्यास माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, संजय वीर, संजय गायकवाड यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह विसापूर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिला आहे. नाहटा यांनी म्हटले आहे की, पाणी प्रश्नाबाबत जून महिन्यात लोणी व्यंकनाथ येथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा.डॉ सुजय विखे यांनी मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी चर्चा करत आवर्तन वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.

या बाबत मागील पाच दिवसांपासून पाठपुरावा करत असताना याची फाईल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सही करण्यासाठी गेली असल्याचे सांगण्यात आले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी पाणी प्रश्नाबाबत उदासीन आहेत. आंदोलन केले त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पाणी प्रश्नावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र दिल्याचे सांगितले. तसेच, आवर्तन तीन दिवस वाढल्याचे सांगत विसापूर धरणात पाणी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडले नाही.

विसापूर लाभक्षेत्रातील पिंपळगाव पिसा, घारगाव, बेलवंडी बु., हंगेवाडी, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव बोडखा, पिसोरे चिंभळा या गावांना विसापूरच्या आवर्तनाची आवश्यकता असल्याने कुकडीचे पाणी विसापूर तलावात सोडावे. जलसंपदा विभागाने विसापूर धरणात पाणी न सोडल्यास लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह विसापूर धरणात जलसमाधी घेणार असल्याचे नाहटा यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी पाणीप्रश्नी उदासीन

तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, तालुक्याचे लोकप्रतिनिधी कुकडीच्या पाणीप्रश्नी उदासीन आहेत. विसापूर धरणाखालील सात गावांत शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने जगविलेली पिके, तसेच फळबागा तीव्र पाणीटंचाईमुळे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news