जामखेड : महाऑनलाईन सर्व्हर डाऊन; विद्यार्थी, पालकांना होतोय मनस्ताप

जामखेड : महाऑनलाईन सर्व्हर डाऊन; विद्यार्थी, पालकांना होतोय मनस्ताप

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांपासून सतत महाऑनलाईन सर्व्हर डाऊन येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया संथगतीने होत असल्याने शैक्षणिक दाखले तत्काळ मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाने महाऑनलाईन सर्व्हरची क्षमता वाढविण्याची गरज असताना सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक प्रवेश घेतानाच सर्व्हर डाऊन होत असल्याने सेतू चालक, अधिकारी, पालक व विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाऑनलाइन सर्व्हर राज्यात डाऊन असल्याने डोमेसाईल, उत्पन्न, ईडब्ल्यूएस, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलीयरसह विविध दाखले मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणीचे ठरत आहे. दाखले वेळेवर मिळाले नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये आहे. रात्री उशिरापर्यंत आपले सरकार सेवा केंद्राचे कामकाज सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी टाकलेले दाखले लवकर व्हावेत, म्हणून तहसील कार्यालयात उशिरापर्यंत कामकाज सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी शाळेचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली की सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक शाळा ऐन वेळेस दाखले प्रवेश घेतानाच लागत आहेत. कागदपत्रे नसल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो, या भीतीनेच पालक व विद्यार्थी हतबल झाले आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊन होत असल्याने प्रवेशाची मुदत वाढविण्याची तसेच ऑफ लाईन दाखले देण्याची मागणी यावेळी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

रात्री उशिरापर्यंत कामकाज : तहसीलदार चंद्रे

सर्व्हर डाऊन होत असल्याने शासनास कळविले आहे. दाखला लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू आहे. सर्व्हर डाऊनमुळे दाखले होण्यास विलंब होत आहे. सर्व्हर चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी दररोज महाऑनलाईन समन्वयक, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करीत आहोत, असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news