

शेवगाव : रमेश चौधरी : तालुक्यात यंदा आतापर्यंत कपाशीतून अडीच अब्ज रुपयांची उलाढाल झाली असून, आता आवक घटल्याने काही जीनिंग बंद झाल्या आहेत. उर्वरित जीनिंग आठवडाभरात बंद होण्याची शक्यता आहे. कपाशी दर वाढण्याच्या प्रतीक्षेत असणार्या अनेक शेतकर्यांना मात्र तोटा सहन करावा लागल्याने यंदा तूर उत्पादनाचा विचार होत आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत घरात थप्पीला असलेल्या कपाशीचे ओझे होत आहे. दरवाढ तर झालीच नाही. मात्र, घसरत्या दरात कपाशी विक्रीशिवाय शेतकर्यांना पर्याय उरला नव्हता. शासनाला आणि नशिबाला दोष देत तोटाच झाला, असे पुटपुटत शेतकरी गुमान रक्कम घेऊन परतताना 'यंदा पहिल्याच धडाक्याला कपाशी विकू,' असा निर्णय घेत होता. त्यातच अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने उशिराने कपाशीची लागवड झाली तर काय? असाही प्रश्न सतावत आहे. अशी द्विधा मनःस्थिती असल्यामुळे आता काय ते पांडुरंगच पाहील, अशी समजूत घालून बळीराजा मन हलके करीत आहे.
तालुक्यात कपाशीचे उत्पन कमी झाले असले, तरी जिल्हा व बाहेरून येणार्या उत्पन्नाने जीनिंगचे फावले. त्यातच अस्सल व्यावहारिक व बाजारपेठेचा इत्थंभूत अभ्यास असलेले उद्योजक जीनिंग मालक असल्याने यंदा बराच काळ काही जीनिंग चालू राहिल्या. त्याने शेतकर्यांची कपाशी विकली आणि बाजार समितीलाही मोठा फायदा झाला. आतापर्यंत येथील जीनिंगमध्ये 3 लाख 64 हजार 295 क्विंटलची आवक झाली. सर्वांत जास्त रिद्धीसिद्धी जीनिंगमध्ये 1 लाख 87 हजार 543 क्विंटलची खरेदी झाली आहे. दीड ते दोन महिने दरवाढ होईल, या आशेने जवळपास दोन लाख क्विंटल कापूस शेतकर्यांच्या घरात थप्पीला राहिला; मात्र कालांतराने ही अपेक्षा फोल ठरल्याने मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. आता जीनिंगची आवक घटत चालली.
त्यामुळे आणखी आठ ते पंधरा दिवसांत संपूर्ण खरेदी बंद होण्याची शक्यता आहे. यंदा तालुक्यात दहा जीनिंग चालू होत्या. त्यापैकी 6 जीनिंग बंद झाल्या असून रिद्धीसिद्धी, अन्नपूर्णा, दुर्गा, वाय. के. कॉटन, अमरापूर या सध्या चालू आहेत. त्यांचीही आवक घटल्याने आठ-पंधरा दिवसांत त्या बंद होण्याची शक्यता आहे. काही शेतकरी चालू दरात कपाशी विक्रीस तयार नसल्याने त्यांची थप्पी घरातच आहे, असे फार थोडे शेतकरी असल्याची माहिती आहे. दरम्यान, 3 लाख 64 हजार 295 आलेली आवक पाहता सरासरी 7 हजार रुपये क्विंटलप्रमाणे 2 अब्ज 55 कोटी 65 हजार (255 कोटी 65 हजार) रुपयांची कपाशी पिकातून उलाढाल झाली आहे. तसेच हमाल, मापाडी, वाहतूकदार यांच्यासह मजुरांना रोजगार मिळाला आहे.
हे ही वाचा :