Nagar : अमरापूरकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ

Nagar : अमरापूरकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील अमरापूर येथील पाणी पुरवठा एक महिन्यापासून खंडित करण्यात आला असून, पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. आधीच दूषित वातावरण अन् त्यातच पिण्यासाठी दूषित खार्‍या पाण्याचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यास ग्रामपंचायत व पंचायत समिती जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पाच हजार लोकवस्ती असणारे अमरापूर गाव गेल्या एक महिन्यापासून पाणी-पाणी करीत आहे.

संबंधित बातम्या :

दीपावली सणाच्या अगोदर पंधरा दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या पाणीपुरवठा अद्यापही पूर्ववत झाला नाही. आठ दिवसांतून एकदा होणार्‍या पाणीपुरवठ्यास अव्वाच्या सव्वा सक्तीच्या पाणीपट्टी वसुलीसाठी पाणी बंद करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आजपर्यंच्या कालखंडात महिनाभर पाणी बंद ठेवण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

आठ दिवसांपासून हवामानात बदल होत असल्याने वातावरण दूषित झाले आहे. अशातच मिळेल तेथून पाणी उपलब्ध करताना पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करणे नागरिकांना भाग पडत आहे. यामुळे लहान बालके, वृद्ध यांच्यासह नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे आजार आणखी बळावण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अमरापूर ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आहे. आमदार भाजपाचा आणि केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता असताना गावात महिन्यापासून पाणी नाही. याच गावात पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाण्याचे टँकर भरले जातात. आसपासच्या लाभार्थी खेड्यांना येथूनच पाणीपुरवठा होतो. मात्र, अमरापूरच्या ग्रामस्थांना महिन्यापासून पाण्यासाठी वेठीस धरल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे.
शेवगावचे गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी केवळ दबावामुळे आपल्या पदाची जबाबदारी विसरून हात वर केले आहेत. त्यामुळे येथील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

अव्वाच्या सव्वा पाणीपट्टी : खैरे
महिन्यापासून गावात पाणी नसल्याने अनेकांनी दिवाळी साजरी केली नाही. मात्र, पाणीपट्टी भरली. दोन दिवस थोडे-थोडे पाणी देऊन पुन्हा पुरवठा बंद केला. तीन वर्षांपासून उत्पन्न नाही, मग अव्वाच्या सव्वा पाणी पट्टी कशी भरणार. वसुली शिवाय पाणी सोडणार नाही, असा निर्णय सरपंचांनी घेतल्याने खारे पाणी पिण्याची वेळ आली आहे, असे ग्रामपंचायत सदस्या चंदा खैरे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा : बोरुडे
पाणी बंद करू नका, पाणी चालू असताना वसुली करावी, अशी सरपंचाशी चर्चा केली होती. मात्र, त्यांनी ऐकले नाही. वसुलीसाठी महिन्यापासून पाणी बंद केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नाईलाजाने पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर होऊ लागल्याने ग्रामस्थ आजारी पडू लागले आहेत. त्यामुळे गावाला तत्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी उपसरपंच गणेश बोरूडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news