अहमदनगर : हा खेड्यातील नव्हे, शहरातील रस्ता; महापालिका प्रशासन ऐकेना

अहमदनगर : हा खेड्यातील नव्हे, शहरातील रस्ता; महापालिका प्रशासन ऐकेना

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : बोल्हेगावमधील गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोदाई केल्याने त्यात पाणी साचत असून, नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. प्रभागात सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक असूनही प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे नगरसेवक वैतागल्याचे बोलले जात आहे. बोल्हेगाव परिसरात दिवसेंदिवस नागरी वसाहत वाढत आहे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्र स्वामी मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर मोठी रहदारी असते. त्यातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे काम झाले आहे.

मात्र, गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्त्याला काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. परंतु, हे काम मनपा फंडातून मंजूर झाल्याचे बोलले जाते. ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करून खोदाई केली. पक्का रस्ता बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. त्यात दोन्ही बाजूंचे ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या लाईन तुटल्या. त्यामुळे अनेक दिवस कामाचा खोळंबा झाला. आता त्या लाईन दुरुस्त झाल्या, तरी ठेकेदार बिल अदा होत नसल्याने रस्त्याचे काम करण्यास तयार नाही.

परिणामी नागरिकांना मोठी कसरत करून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. पाऊस झाल्याने खोदाई केलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे झालेल्या चिखलातून शाळकरी विद्यार्थी, महिलांना पायी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक प्रभागातील नगरसेवकांसमोर व्यथा मांडतात. नगरसेवकही पाठपुरावा करून वैतागले असून, प्रशासन नगरसेवकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. बोल्हेगाव परिसरात शिवसेना व राष्ट्रवादीचेच नगरसेवक आहेत. तरीही रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला असून, पुढे काम करण्यास तो तयार नाही. नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. आज नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी पक्षात असूनही प्रशासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

– कमल सप्रे, नगरसेविका

गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काम होत नाही. ठेकेदाराचे बिल अदा होत नसल्याने ठेकेदार काम करीत नाही. आम्हाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.

– अशोक बडे, नगरसेवक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news