अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 147 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत संपला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झाले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींवर सात ते आठ महिन्यांपासून प्रशासकीय राज आहे. सार्वत्रिक निवडणुकांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत.

जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात 195 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची गेल्या चार पाच महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू केली. त्यामुळे आजमितीस 188 ग्रामपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदारयादी तयार केली आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षणदेखील यापूर्वीच जाहीर झाले आहे.

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत आश्वी बुद्रुक व खुर्द, पोहेगाव, उंदिरगाव, चितळी, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूरसह 147 ग्रामपंचायतींचा कालावधी संपला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे गावपातळीवर विकासात्मक कामे रखडली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सार्वत्रिक निवडणुका घ्या, जेणेकरून विकास कामे मार्गी लागतील, अशी मागणी गावपातळीवर नेतेमंडळी करीत आहेत. त्यामुळे 147 गावांतील राजकीय पदाधिकारी सार्वत्रिक निवडणुकांचे जाहीर कार्यक्रमाची वाट पाहत आहेत.

राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती

आश्वी बुुद्रुक, घारगाव, पोहेगाव, उंदिरगाव, चितळी, वारी, दाढ बुुद्रुक, पिंपरी निर्मळ, उक्कलगाव, दत्तनगर, नाऊर, वाकडी, फत्याबाद, सडे, देसवंडी, वाडेगव्हाण, कान्हूर पठार, विसापूर, कोळगाव, अरणगाव, देऊळगाव सिद्धी, बारदरी, पैठण, घोटी, गुंजाळवाडी, कोंभाळणे, माळवाडी, जवळके.

हेही वाचा

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे : संभाजी भिडे

मृत्यूच्या 27 मिनिटांनंतर ‘ती’ पुन्हा झाली जिवंत!

लोकप्रतिनिधींनी उत्तरे द्यावी अन्यथा 2024 दूर नाही : युवराज संभाजीराजे यांची भुजब‌ळांवर टीका

Back to top button