नगर तालुक्यात लाल कांदा लागवडीचा जुगार!

नगर तालुक्यात लाल कांदा लागवडीचा जुगार!

नगर तालुका : नगर तालुका ज्वारीचे पठार म्हणून ओळखला जायचा. परंतु गेल्या दोन दशकांपासून तालुक्यात लाल कांदा, गावरान कांदा, रांगडा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने तालुका कांद्याचे पठार म्हणून उदयास येत आहे. सद्यस्थितीत लाल कांदा लागवडीची लगबग सुरू झाली असली तरी कांद्याचे संपूर्ण भवितव्य आगामी होणार्‍या पावसावरच अवलंबून आहे. लाल कांदा लागवड करून शेतकरी जुगारच खेळत आहेत. चालू वर्षी कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

नगर तालुका हा पर्जन्य छायेचा म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील पर्जन्याचे प्रमाण चांगले राहिले आहे. तालुक्यातील 110 गावांपैकी बहुतांशी गावे गर्भगिरीच्या डोंगर उतारावर वसली आहेत. त्यामुळे या गावच्या भौगोलिक संरचनेनुसार पावसाळ्यात सुरुवातीलाच भूजल पातळीत वाढ होते, तर उन्हाळ्यात विहिरी, बंधारे, तलाव कोरडे ठाक पडतात. डोंगर उताराची, पाण्याचा निचरा होणारी जमीन लाल कांदा उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात जेऊर, बहिरवाडी, इमामपूर, खोसपुरी, चास, वाळकी, विळद पट्ट्यात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

संबंधित बातम्या :

साधारणपणे बैलपोळ्यापासून लाल कांदा लागवडीला सुरुवात होते. परंतु चालू वर्षी पाऊस नसल्याने लाल कांद्याच्या लागवडीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचे दिसते. पावसाने तब्बल तीन महिने दडी मारल्याने कांद्याचे रोपे टाकण्यासाठीच पाणी उपलब्ध नव्हते. त्याचा परिणाम कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट होणार आहे. जिरायत जमिनी सिंचनाखाली आणून तालुक्यातील कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उत्तरा नक्षत्रात तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांबाबत अशा पल्लवित झाल्या आहेत.
डोंगर उतारावरील भागात थोड्याफार प्रमाणात भूजल पातळीत वाढ झाली.

परंतु रब्बी पिकांसाठी झालेला पाऊस पुरेसा नाही. ज्या भागात पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली, अशा ठिकाणी लाल कांदालागवडीची लगबग सुरू झाली आहे. आगामी चित्रा, स्वाती नक्षत्रात वरुणराजा कृपा करेल याच आशेवर शेतकरी लाल कांदा लागवडीचा जुगार खेळत आहे. तसेच परतीच्या पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली, तरच रब्बीचे पिके घेता येणार आहेत. त्यामुळे शेतकरी अद्यापि पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गावरान कांदा, रांगडा कांद्याचे रोपे टाकण्यात शेतकरी व्यस्त आहेत. परंतु रब्बी पिकांचे संपूर्ण भवितव्य पावसावरच अवलंबून आहे. आजही अनेक गावांत भूजल पातळीत वाढ झाली नसून पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारली तर शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढावणार आहे.

तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. बंधारे, तलाव, नद्या, नाले कोरडेठाक आहेत. त्यामुळे कांदा पीक निघण्याची शाश्वती नाही. शेतकर्‍यांनी कमी पाण्यात येणारी ज्वारी, करडई, सूर्यफूल, हरभरा, चारा पिके घेण्याची गरज आहे.
                         -संदीप काळे, साईनाथ कृषी उद्योग तथा कृषी सल्लागार

डोंगर उतारावर जमीन असल्याने विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे लाल कांद्याची लागवड करण्यात येत आहे. परंतु एवढ्या पावसावर कांदा पीक निघणार नाही. त्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.
                                                          सिराज शेख, शेतकरी, जेऊर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news