

नगर : पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब जनतेला गौरी गणपतीसाठी वाटप करण्यात येत असलेल्या 'आनंदाचा शिधा' या किटमधील तूट आणि वस्तूंच्या दर्जाबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. चनाडाळीत किडे आढळले असून, पामतेलामुळे घशात खवखव होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पुरवठादाराला जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली असून, वस्तूंचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
दिवाळी आणि गौरी गणपतीसाठी पात्र रेशनकार्डधारकांचे तोंड गोड करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा हे किट रेशनकार्डधारकांना वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार एक किलो साखर, रवा व चनाडाळ आणि एक लिटर पामतेल या चार वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे. गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर स्वस्तधान्य दुकानांमार्फत पात्र रेशनकार्डधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत या किटचे वाटप करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार गेल्या आठवडाभरापासून वाटप सुरू आहे.
मात्र वाटपासाठी शेवगाव, राहुरी, नगर शहर, अकोले येथील गोदामांत आनंदाचा शिधा हे किट उपलब्ध झाले. यामधील चनाडाळीत किडे आढळून आल्याची तक्रार गोदामातील कर्मचारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांनी केली. साखर, डाळ, रवा आणि पामतेल या वस्तूंचा 15 किलोचा बॉक्स असल्याचे पुरवठादारांनी सांगितले. मात्र, हा बॉक्स 12 किलोचा असल्याचे गोदामातील कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदारांनी तक्रारीत म्हटले आहे.
रेशनकार्डधारकांना उपलब्ध झालेल्या वस्तूंपैकी पामतेल खाल्याने घशाला खवखव होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. दर्जा आणि तूट या सर्व तक्रारींची दखल घेऊन, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी संयुक्तपणे पुरवठादारांना नोटिसा बजावल्या आहेत. चनाडाळ आणि पामतेल यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील शासकीय एनएबीएल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले.