मतदारसंघात पाच वर्षांत भरीव विकासकामे : आमदार मोनिका राजळे

मतदारसंघात पाच वर्षांत भरीव विकासकामे : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्याने आता अनेक मंडळी फिरायला येत असून, त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मात्र, आपण पाच वर्षांत भरीव विकासकामे केली असून, यावरच आपल्याला प्रचार करायचा आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मागील वर्षी पेक्षाही जादा मताधिक्य तालुक्यातून द्यायचे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांमध्ये वाढ कशी होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
धामणगांव, कुरणतांडा, कोळसांगवी, काटेवाडी, खरवंडी, टाकळीमानुर, मंचरवाडी, अंबिकानगर, चुंभळी, दातीरवाडी, अकोला, मोहटा, हंडाळवाडी आदी ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक, तांडा सुधार, लेखाशीर्ष, अर्थसंकल्प, राज्यस्तरीय दलितवस्ती योजना व आमदार स्थानिक विकास निधी योजनेतून विविध विकासकामे, विद्युत पुरवठा करणे, नवीन विद्युत रोहित्र बसविणे, ग्रामपंचायत कार्यालय, अशा सुमारे अकरा कोटींच्या कामांचे गुरुवारी (दि.7) आमदार राजळे यांच्या हस्ते लोकार्पण व प्रारंभ करण्यात आले.

यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नारायण पालवे, मधुकर देशमुख, रामकिसन काकडे, रवी आरोळे, पुरुषोत्तम आठरे, पप्पू काळे, शिवाजी काकडे, भाऊसाहेब मरकड, सुनील माघाडे, अशोक कराळे, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, दिगंबर भवार आदी उपस्थित होते. आमदार राजळे म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात एक सरकार असल्यामुळे एवढा निधी मतदारसंघात मिळत आहे. पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यांना समान न्याय देण्याच्या हिशेबाने आलेल्या विकास निधीचे समान वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यांसाठी एकत्रितपणे सुमारे 35 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी आगामी काळात निधी उपलब्ध होणार आहे. मतदारसंघात 71 किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले आहेत. यातील काही कामे झाली असून, काही बाकी आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात कोणता ना कोणता विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.

'त्या' ठेकेदाराचे बिल काढू नका

धामणगाव येथे नुकत्याच झालेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांमध्ये काही त्रुटी असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार राजळे यांच्याकडे केली. त्याची तात्काळ दखल घेत, त्यांनी अधिकार्‍यांना सूचना करत रस्त्याच्या त्रूटी दुरुस्त होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा न करण्याची तंबी दिली.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news