श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : आदिवासी एकता परिषदेच्या महिलांनी मेनरोड मार्गे सय्यद बाबा चौक ते प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. प्रारंभी महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आदिवासी एकताच्यावतीने कैलास माळी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी किरण सावंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माळी म्हणाले, स्वतंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने आदिवासींच्या विकासाबद्दल ठोस भूमिका न घेतल्याने आदिवासींना मतदान मागण्याचा अधिकार नाही. आदिवासी स्वतःच्या विकासासाठी आजही मोचें, आंदोलन करुन आमचा विकास करा, असे म्हणत असेल, तर राजकीय पक्षांनी व आदिवासींना गृहीत धरु नये, असा इशारा त्यांनी दिला.
मोर्चातील निवेदनात म्हटले आहे की, जातीचे प्रमाणपत्र स्थानिक चौकशी करुन व ग्रामसभेचा ठराव अंतिम धरुन भिल्ल समाजाला सरसकट द्यावे. स्वतंत्र भिल्ल प्रदेशाची स्थापना करावी. भिल्ल विकास आराखडा मंजूर करावा. सबलीकरण योजनेंतर्गत जमीन वाटप करावे. भामाठाण, टाकळीभान, पढेगाव, कान्हेगाव, गोवर्धन, गळनिंब तर राहुरीतील लाख, सोमय्या फार्म, माहेगाव, खुडसरगाव, सेनवडगाव, जातप, मुसळवाडीसह प्रत्येक गावामध्ये भिल्ल समाज जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड वाटप शिबीर घेवून, वितरीत करावे, राजूर येथील मोर्चातील मागण्यांची अंमलबजावणी करुन एनबीची प्रकरणे मंजूर करावे. दुधाळ जनावरांचे वितरण करावे.
2011 च्या अगोदरचे राहत्या जागेचे प्रस्ताव त्वरीत नियमानुकूलित करावे, सोनई प्राणघातक हल्यातील आरोपींना अटक करुन, खोटे गुन्हे मागे घ्या, अशा मागण्या करण्यात आल्या. माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी मोर्चास पाठींबा दिला. यावेळी रामेश्वर जाधव, रामकिसन सोनवणे, रमेश माळी, अंबदास गोलवर, सुदाम माळी, अक्षय पवार, लता पवार, अंकुश पवार, राहुल पवार, अनिल मोरे, सोपान पवार, बबन आहेर, रावसाहेब पवार, शिला मोरे, सुगंधा आहेर, अलका माळी, कांचन माळी, मंदा माळी, कविता खैरे, शारदा मोरे, शोभा पवार, चंदा सोनावणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा