मढी यात्रेवर पाणीटंचाईचे संकट : यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक | पुढारी

मढी यात्रेवर पाणीटंचाईचे संकट : यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक

मढी : पुढारी वृत्तसेवा : यंदा पाऊस कमी झाल्याने मढी यात्रेवर पाण्याचे संकट आहे. जलजीवन योजनेसह इतर पाणी योजनेला आलेल्या समस्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी कामाला लागावे. यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने, तसेच भाविकांना पिण्याच्या पाणी देण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याने देवस्थान समितीच्या सहकार्याने मढी यात्रेत पाणीटंचाईवर मात करू, अशी ग्वाही प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली . श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत अशी पंधरा दिवस चालते. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांसह देवस्थान समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मढी येथे कानिफनाथ गडावर बैठक झाली.

त्या वेळी प्रांताधिकारी मते बोलत होते. या वेळी तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मढी देवस्थान अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, बबन मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, सचिव विमल मरकड, भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाट, सचिन गवारे, भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, श्यामराव मरकड, गणेश पालवे, नवनाथ मरकड, भाऊसाहेब निमसे, बाळासाहेब मरकड, डॉ. रमाकांत मडकर, भानूविलास मरकड, पोपट घोरपडे, चंद्रभान पाखरे आदींसह विविध यंत्रणांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी संजय मरकड म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची समस्या मोठी असल्याने वांबोरी चारीचे पाणी तलावात सोडण्यात यावे.

प्रशासनाने परवानगी दिल्यास कासार पिंपळगाव ते मढी जलवाहिनी यात्रेअगोदर पूर्ण होऊन भाविकांना पाणी देता येईल. यात्रा काळात महावितरणने भारनियमन करू नये. तसेच मढी ते तिसगाव व मढी ते फुलोराबाग रस्त्याची दुरुस्ती करावी. यंदाही पशुहत्या बंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले की, ग्रामपंचायत व देवस्थान हद्दीत व्यावसायिकांसाठी देण्यात येणार्‍या जागा रस्ता सोडून द्याव्यात. मायंबा व तिसगावकडे जाणार्‍या रस्त्यावर एकाही दुकानाला जागा देऊ नये. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. परिसरातील शेतकर्‍यांनी स्वतःच्या जागेत पार्किंग व्यवस्था करावी.

मुख्य व भाविकांच्या गर्दीच्या दिवशी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले. यात्रा कालावधीत मोबाईल टॉवरच्या व्हॅन व फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी भानूविलास मरकड यांनी केली. यात्रेसाठी जादा एसटी बसेसची व्यवस्था करणार असल्याचे परिवहन मंडळातर्फे सांगण्यात आले. यात्रेसाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने टँकर उपलब्ध करून द्यावेत. टँकरचे पाणी परिसरातील विहिरीत व टाक्यामध्ये सोडून भाविकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button