अजित पवार गटाला धक्का ! बाबासाहेब भोस शरद पवार गटाच्या वाटेवर..?

अजित पवार गटाला धक्का ! बाबासाहेब भोस शरद पवार गटाच्या वाटेवर..?

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  बाबासाहेब भोस यांनी नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेत आपली राजकीय भुमिका त्यांच्यासमोर मांडली असून भोस हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून, याबाबत ते आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहेत. भोस हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने हा नागवडे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. नागवडे कारखान्याच्या निवडणुकीपासून तालुक्यात नागवडे गटासोबत राहण्याची भूमिका बाबासाहेब भोस यांनी घेतली होती. त्याचवेळी आपण खा. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट करायला भोस विसरले नव्हते. मात्र, मागील महिन्यात अनुराधा व राजेंद्र नागवडेंनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी नागवडेंनी मनधरणी केल्याने भोस यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला. त्यात अजित पवार गटात नको त्या मंडळींचा हस्तक्षेप वाढल्याने भोस नाराज असल्याचे बोलले जात होते.

त्याचाच एक भाग म्हणून भोस यांनी  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. त्यातच शुक्रवारी(दि.५) सायंकाळी जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी खा. शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित होते. या भेटीमुळे भोस पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.  दरम्यान, शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे भोस यांचे नातेवाईक आहेत. लोकसभा निवडणुकीत लंके यांना मदत करण्याची भोसांची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोस यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याची अटकळ बांधली जात आहे.  भोस नागवडे कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.यापूर्वी नागवडे यांचे कट्टर समर्थक प्रशांत दरेकर यांनी नागवडे गटासोबत न जाता काँगेस मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. आता भोस यांनीही  वेगळी भूमिका घेतली असल्याच्या चर्चेने नागवडे गटात अस्वस्थता पसरली आहे.

मी गेली अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेत काम करत आहे.रयतच्या कामानिमित्त मी  खा. शरद पवार यांना भेटलो होतो. गुरुवारी(दि.११) पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करू.

          – बाबासाहेब भोस, उपाध्यक्ष, नागवडे कारखाना

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news