पुणतांबा : साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात; 16 कोटी रुपयांचा निधी होणार खर्च

पुणतांबा : साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात; 16 कोटी रुपयांचा निधी होणार खर्च

पुणतांबा; पुढारी वृत्तसेवा : गावात निर्माण होणारी पाणीटंचाई व वाडीवस्तीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मंजूर झालेल्या 16 कोटी रुपये खर्चाच्या जनजीवन मिशन योजना कामातील जुन्या साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून पाणीसाठा वाढणार आहे. पाच सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या 'जलस्वराज्य टप्प्या 2' या सुमारे 17 कोटी रुपये खर्चाच्या योजनेतील अंतर्गत जलवाहिनी, नवीन साठवण तलाव, चार जलकुंभ आदी कामे पूर्ण झाली असून काही त्रुटी वगळता योजना कार्यान्वित झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी जनजीवन मिशन योजना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली आहे, यामध्ये वाड्या वस्त्यांसाठी जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणे, नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा आणि जुन्या साठवण तलाव दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे. पाच वर्षांत 33 कोटी रुपये खर्चाच्या दोन योजना मंजूर होऊन एका योजनेचे काम पूर्ण तर दुसरीचे प्रगतीपथावर असल्याने गावाचा पाणीप्रश्न मिटला असून वस्ती भागाचा लवकरच मिटणार असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

नवीन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात जुन्या साठवण तलावाचे खोलीकरण व कागद टाकणे या कामास सुरुवात झाली आहे. 52 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या या तलावास पाणी गळती मोठ्या प्रमाणात असल्याने 20 ते 22 दिवसात तलाव कोरडा पडत होता. त्यातच गोदावरी कालव्याचे आवर्तन लांबल्यास गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. या कामामुळे पाणी गळती थांबुन पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून योजना तसेच तलावाच्या वाढीव कामास मंजुरी असून यामुळे गळती थांबुन पाणीसाठा वाढणार आहे. भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार नाही तसेच वाडी वस्तीसाठी काम लवकरच सुरू होणार आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेचे कामही दुसर्‍या टप्प्यात सुरू होऊन दोन – तीन महिन्यांत काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न आहे. साठवण तलावाचे सुरू असलेल्या कामाबाबत ठेकेदारांना योग्य सुचना देऊन पावसामुळे कामास धोका निर्माण होऊ नये, यासाठी मजुर वाढवून काम वेळेत पूर्ण व दर्जा चांगला राहिल, हा प्रयत्न राहणार आहे.

– डॉ. धनंजय धनवटे, अध्यक्ष, पाणी पुरवठा कमिटी, पुणतांबा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news