श्री गणेश साखर कारखाना निवडणुक : भाजपचे विखे-कोल्हे यांचा ‘अबोला’ नडला | पुढारी

श्री गणेश साखर कारखाना निवडणुक : भाजपचे विखे-कोल्हे यांचा ‘अबोला’ नडला

विष्णू वाघ

अहमदनगर : जिल्ह्याच्या नावामध्ये काना, मात्रा, उकार नसल्याने तसा सरळ वाटणारा हा जिल्हा राजकारणात पुर्णपणे वेगळा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या जिल्ह्यातील राजकारणात ‘सो-धा’ (सोयरे-धायरे) पक्ष असा उल्लेख केला आहे. मात्र काळान्वये यामध्ये अनेक बदल होवून आता ‘सो-धा’ पक्ष तर सोडाच पण पक्षीय राजकारणाच्या भिंती बाजुला सारून श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेसचे गटनेते तथा माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व भाजपचे सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे एकत्र येत त्यांनी राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिण नगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या गटाचा पराभव केला.

वरकरणी या निकालात विखे-थोरात यांचेतील पारंपारीक राजकीय संघर्ष दिसत असला तरी भाजपच्या विखे व कोल्हे या दोन घराण्यातील ‘अबोला’ नडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कारखान्यात आजपर्यंत विखे व कोल्हे गटाची सत्ता राहिली आहे. हे दोन्ही नेते आज भाजप मध्ये आहे. त्यांनी ठरविले असते तर ही निवडणूक बिनविरोध होणे शक्य होते. मात्र थोरात व कोल्हे यांच्या एकीने विखेंची वजाबाकी झाली आहे.

राज्यात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहचला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात पहिल्या सत्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडी सरकारने काम पाहिले. तर दुसर्‍या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कार्यरत आहे.

दोन्ही सरकारमध्ये महसुलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदभार सांभाळला आहे. या दोन्ही नेत्यांचे राजकीय वैर हे एका पक्षात असतांना जसे टोकाचे होते ते दोन पक्षात गेल्याने अधिक धारदार झाले आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये एकमेकांचे विधानसभा मतदारसंघाची तोडफोड झाल्याने हा संघर्ष रस्त्यावर आला. परंतु गणेश कारखान्याच्या निवडणुकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे हे ‘भाजप’ एका पार्टीत असतांना त्यांच्यात निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा घडली नाही.

दोन्ही नेत्यांना राहाता बाजार समिती निवडणुकीत झालेल्या मतभेदामुळे ‘इगो’ झाला. याचाच फायदा उठवत माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विवेक कोल्हे यांचेकडे मदतीचा हात पुढे करून महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जबर धक्का दिला आहे. कोपरगाव व राहाता तालुक्याच्या सिमेवर गणेशनगर येथे असलेला श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची स्थापना सन 1957 मध्ये झाली. त्यावेळी आद्य प्रवर्तक म्हणून सरकारी अधिकार्‍याने चेअरमन म्हणून काम पाहिले. तर व्हा. चेअरमन म्हणून सीताराम रावजी लहारे यांनी कार्यभार सांभाळला. सन 1959 मध्ये कारखान्याचा पहिला ट्रायल सिझन झाला. यावेळी बाबुराव कडू चेअरमन होते. सुरूवातीला 800 टन क्षमतेने कारखान्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला.

सन 1973 च्या पंचवार्षिक निवडणुकीत स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा विजय झाला. सन 1973 ते 1978 च्या कार्यकाळात दादासाहेब सदाफळ, नानासाहेब जगताप व विठ्ठलराव लहारे यांनी चेअरमन म्हणून काम पाहिले. सन 1978 ते 1983 च्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे सुत्र स्व. सहकार महर्ष शंकरराव कोल्हे यांच्याकडे गेले. ज्येष्ठ नेते स्व. भास्करराव जाधव यांनी चेअरमन म्हणून पाच वर्ष गणेशचा कारभार हाकला.

सन 1983 ते 1987 च्या पंचवार्षिक निवडणुकीत गणेशच्या सभासदांनी पुन्हा सत्तांतर करून कारखान्याची सुत्रे स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचेकडे सोपविली. सदरच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विठ्ठलराव पा. लहारे यांचेकडे चेअरमन म्हणून जबाबदारी देण्यात आली. परंतु सन 1987-88 मध्ये ऊसाचा तुटवडा व आर्थिक आरिष्टामुळे कारखाना बंद पडला. त्यावेळी कारखान्याच्या चेअरमन पदाची सुत्रे रावसाहेब बापुराव तुरकणे यांचेकडे देण्यात आली.

सन 1989 ला झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात सत्ताबदल झाला. बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ‘कोल्हे पॅटर्न’ चा फॉर्म्युला उदयास आला. या कोल्हे पॅटर्नमध्ये कामगारांचे 20 टक्के पगार कपात करणे व सभासदांचे प्रती टन 30 रुपये भाव कमी देण्याचे ठरले.

कोल्हे पॅटर्नच्या धोरणानुसार सुरूवातीला दोन वर्ष सर्व कर्जाच्या वसुलीस दोन वर्ष स्थगिती मिळाली. इतर देणी समान पाच हप्त्यामध्ये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे कामगारांच्या पगारातून एक कोटी तर सभासदांच्या ऊस पेमेंटमधून 60 लाख अशी 1 कोटी 60 लाखांची शासकीय देणी देण्यात आली. सन 1989 ते 2014 असे सलग 25 वर्ष गणेशची एकहाती सत्ता शंकरराव कोल्हे यांच्याकडे राहिली. दरम्यानच्या काळात कोल्हे यांनी कारखाना नेटकेपणाने चालवितांना सभासद वाढीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत वाढीव सभासद व काटेकोर कारभाराच्या जोरावर सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.

दरम्यान अ‍ॅड. नारायण कार्ले यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात सन 2012 मध्ये गणेश कारखाना पुन्हा ऊसाची कमतरता व आर्थिक अडचणीमुळे बंद पडला. कारखान्याचे नेटवर्क मायनस झाले. संचित तोटा वाढल्याने राज्य बँकेसह सर्वच बँकांनी आर्थिक सहाय्य देण्याचे नाकारले. कारखान्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली. वीज बिल थकल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. तसेच पाणी व परिसरातील आर्थिक चक्र ठप्प झाल्यामुळे कामगार सैरभैर झाले.

अ‍ॅड. कार्ले यांच्या चेअरमन पदाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शेवटचे दोन वर्ष बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. परंतु अखेर कारखाना खाजगी मालकाला चालविण्यासाठी देण्याचे ठरले. त्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध झाली. परिसरातील अनेकजण कारखाना घेण्यासाठी पुढे सरसावले. अखेर कामगार व सभासदांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना साकडे घातले. आपल्या परिसरातील गणेश कारखान्याचे खाजगीकरण झाले. तर कारखान्याची विक्री होवू शकते. कारखाना गेला तर या परिसरावर मोठे आर्थिक आरिष्ठ येवू शकते. आपण कारखाना चालवावा, असा हट्ट धरला.

कामगार व सभासद व राहाता तालुक्यातील दुष्काळीपट्टा समजल्या जाणार्‍या गणेश परिसराच्या हितासाठी ना. विखे पाटील यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावून 8 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर सन 2014 ला कारखाना सुरू केला. श्री गणेशची बँकांकडे पत नसल्याने ना. विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे नंबर दोनचे युनीट म्हणून गणेशचा कार्यभार सांभाळला.

सुरूवातीला 33.33 कोटी रुपये शासकीय देणे दिली. त्यामुळे कारखान्याची वीज, पाण्यासह कारखान्याचे चाक हालले. गणेश कारखाना चालवितांना खा. डॉ. सुजय विखे पा.यांना मोठे कष्ट घ्यावे लागले. रात्रं-दिवस काम करून त्यांनी जुनी मशिनरी बदलून कारखाना सुरू ठेवण्यासाठी मोठा भांडवली खर्च केला. 8 वर्षाच्या करारामध्ये ठरलेल्या धोरणापेक्षा अधिकचा खर्च झाल्याने सरकारने त्यांना पुढील 5 वर्षाचा करार करून दिला. याच कारनाने न्यायालयाने विखे विरोधकांचे अपिलही फेटाळले.

आज गणेशची सत्ता कोल्हे व थोरात यांच्या हाती आली आहे. हे शिवधनुष्य पेलने दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. गणेशच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे सभासद जादा असले तरी थोरात व कोल्हे यांनी श्री गणेश कारखाना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे चालवू. सभासदांच्या ऊसाला भाव व कामगारांचे पगार देवू ही घोषणा केली. नेमकी हीच घोषणा सभासद व कामगारांना अधिक भावली. त्यामुळे गणेशच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाची सरशी झाली.

‘गणेश’वर 10 वर्षे विखे तर 30 वर्षे कोल्हेंची सत्ता

सन 1957 ला स्थापन झालेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्यावर 1973 ते 78 व 1983 ते 88 अशी 10 वर्षे विखे पाटील यांची सत्ता होती. तसेच 1978 ते 83 व 1989 ते 2014 अशी 30 वर्षे कोल्हे गटाची सत्ता होती. 2014 ते 2022 असे 8 वर्ष गणेश कारखाना विखे पाटील यांनी भाडे पट्यावर चालविला. या कारखान्याची सत्ता आता माजीमंत्री बाळासाहेब थोरात व युवानेते विवेक कोल्हे यांच्याकडे आल्याने सभासद व कामगारांच्या अपेक्षा वाढल्या आहे.

विखे व कोल्हे दोघांच्या नेतृत्वात ‘गणेश’ बंद

सन 1987 मध्ये विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला गणेश सहकारी साखर कारखाना ऊसाचा तुटवडा व आर्थिक अडचणीसह संचालक मंडळातील दुहीमुळे बंद पडला. तसेच सन 2012 मध्ये ऊसाचा तुटवडा, आर्थिक अडचण व संचित तोट्यामुळे कारखाना बंद पडल्याचा इतिहास आहे.

सभासद वाढीचा कोल्हे यांना फायदा

विखे पाटील यांच्या 10 वर्षातील सत्ता काळासह 8 वर्षाच्या भाडेपट्याच्या कार्यकाळात त्यांनी सभासद वाढीकडे लक्ष दिले नाही. कारखाना चालविणे सभासद, कामगारांचे हित जपण्याकडे लक्ष दिले. कारखान्याची क्षमता 3 हजार मे. टन केली. दरम्यान कोल्हे यांच्या कार्यकाळात आदर्श कोल्हे पॅटर्न प्रमाणे कारखाना चालविताना त्यांनी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत सभासद वाढ केली. हीच सभासद वाढ त्यांना यावेळी अटी-तटीच्या निवडणुकीत फायदेशीर ठरली.

हेही वाचा

“परिवार तुम्हाला देखील आहे, आम्ही बोललो तर… ”; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

भाजप मोठ्या राज्यात कुठेही नाही; मग धसका का घ्यायचा ? संजय राऊत

पुणे झेडपीच्या औषध खरेदीला टेंडरचा ‘डोस’

Back to top button