सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या दोनशे संस्थांमध्ये !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या दोनशे संस्थांमध्ये !
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  टाइम्स हायर एज्युकेशनच्या आशिया क्रमवारीत पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. गेल्या वर्षी 200 ते 251 या गटात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कामगिरीत सुधारणा करून यंदा या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.  टाइम्स हायर एज्युकेशनची आशिया क्रमवारी 2023 नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यापन, संशोधन, सायटेशन्स, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असे एकूण 13 निकष विचारात घेऊन उच्च शिक्षण संस्थांचे क्रमवारीसाठी मूल्यमापन करण्यात येते.
त्यानुसार देशातील एक संस्था पहिल्या दोनशे संस्थांमध्ये, चार संस्था पहिल्या शंभर संस्थांमध्ये आणि 18 संस्थांचा पहिल्या दोनशे संस्थांमध्ये समावेश आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने यात 48वे स्थान पटकाविले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या संस्थेची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. राज्यातील केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच क्रमवारीतील पहिल्या दोनशे संस्थांमध्ये स्थान प्राप्त करता आले. 201-250 या गटात पुण्याचे सिम्बायोसिस विद्यापीठ, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, 351 ते 400 या गटात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, पुणे), 401 ते 500 या गटात मुंबई विद्यापीठाचा
समावेश आहे.
टाइम्स हायर एज्युकेशनच्या वार्षिक क्रमवारीत विद्यापीठ 200 च्या आत आल्याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने सातत्याने संशोधनातील प्रगती, कॅम्पसवरील इनक्युबेशन प्रक्रिया, नवे उद्योजक घडविण्यासाठी पोषक वातावरण, विद्यार्थी व शिक्षकांनी नवीन कंपनी स्थापन कराव्यात यासाठी प्रोत्साहन, तंगज्ञानाचा वापर करून बनविलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने लवचिक अभ्यासक्रम तयार केले आहेत. या सगळ्याचा परिणाम रँकिंगमध्ये दिसतो आहे.
                                                          – प्रा. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ 190 व्या स्थानी आहे. मागील वर्षी ते 201 ते 250 मध्ये होते. अध्यापन, संशोधन, ज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, या मापदंडावर संस्थांचे परीक्षण करण्यात आले होते. सर्वच क्षेत्रांत सातत्यपूर्ण गुणवत्तावाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. त्या प्रकारचे प्रयत्न आणि उपाययोजना आम्ही करीत आहोत.  आगामी काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करून विद्यापीठ सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहील, असा विश्वास आहे.
                         – राजेश पांडे, सदस्य, राज्य सल्लागार समिती,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news