

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणी विरोधात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी भालसिंग यांचे वाळकी या जिल्हा भालसिंग यांच्या गावी धाव घेत निवड रद्द करण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी जाहीर केलेल्या भाजप पदाधिकार्यांच्या नवीन यादीत ज्यांनी यापूर्वी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर सदस्य व पदाधिकारी म्हणून काम केले. त्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बोळवण करण्यात आली. ज्या गोकुळ दौंड यांनी नुकतीच राजळे यांच्यावर टीका केली. त्या दौंड यांना भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी संधी दिल्याने राजळे समर्थक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
संबंधित बातम्या :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी काहींनी संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. गुरवारी (दि. 14) सायंकाळी भालसिंग यांनी ज्यांची सदस्य म्हणून बोळवण केली, तसेच शेवगाव व पाथर्डी तालुकाध्यक्षांची निवड न केल्याने नाराज झालेले कार्यकर्ते काल राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी गेले. त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी थेट वाळकी गाठत भालसिंग यांना निवड यादी रद्द करण्याची मागणी केली. भालसिंग यांनी फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते माघारी परतले. मात्र, शिस्तबद्ध पक्षातील कार्यकर्त्यांनी बंड पुकारल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार राजळे कशी समजूत काढणार?
आमदार मोनिका राजळे कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करता, त्यांनी फोन घतला नाही.