अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जेऊर येथील चापेवाडी ते शेटे वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जेऊर येथील चापेवाडी ते शेटे वस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग ते चापेवाडीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. परंतु, चापेवाडी ते शेटे वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच दूध व्यावसायिकांना चिखलातून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्याबाबत वारंवार मागणी करून देखील दखल घेण्यात आली नाही. शेटेवस्ती तसेच तोडमल वस्तीवरील नागरिकांची रस्त्याअभावी गैरसोय होत आहे. या परिसरात मोठी लोकवस्ती असून, रस्त्याचे काम मार्गी लागणे गरजेचे आहे.
चापेवाडी ते शेटेवस्ती रस्त्याच्या कामाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शरद तोडमल, हेमंत शेटे, बाळासाहेब देशमुख, गोरक्षनाथ तोडमल, रमेश पवार, प्रणव पवार, गोरख तोडमल, संपत वने, सुधीर पवार, प्रवीण पवार, सूरज पवार,सुदाम वने, सुरेश पवार, बाळासाहेब शेटे यांनी केली.
हेही वाचा