

कोळपेवाडी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी उजव्या कालव्याच्या लगत सुरू असलेल्या बिंगो जुगारावर पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याचे दिसून येत असून त्याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. सुरेगाव परिसरात गोदावरी उजव्या कालव्याच्या लगत कोपरगाव, राहाता शहरातील व्यक्तींनी सुरु केलेल्या बिंगो जुगारामुळे बेरोजगार तरुणाई या बिंगो जुगारात गुरफटून व्यसनाधीन होत होती. बाहेरच्या व्यक्ती येऊन सुरेगाव मध्ये बिंगो जुगार सुरू करतात, मग आपण का नाही बिंगो जुगार सुरू करत, अशी भावना निर्माण झाल्यामुळे काही स्थानिकांनी देखील बिंगो जुगार सुरू केल्यामुळे एकाच वेळी पाच पाच बिंगो जुगार सुरू झाले होते.
या बिंगो जुगारात तरुणाई गुरफटत चालल्यामुळे सुरेगावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत वाबळे यांनी प्रसिध्दी माध्यमांच्या मार्फत बिंगो जुगार तातडीने बंद करावे, यासाठी अनेकवेळा पोलीस प्रशासनाला विनंती केली होती. मात्र पोलिस प्रशासनाने सरपंच शशिकांत वाबळे यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे बिंगो जुगाराला पोलिसांचा अप्रत्यक्षपणे आशीर्वाद असल्याचे नागरिकांमधून राजरोसपणे बोलले जात होते. त्याबाबत नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.
परंतु दोन-तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी एका बिंगो जुगार चालकावर कारवाई केली खरी, परंतु त्या कारवाईनंतर देखील इतर बिंगो जुगार सुरूच आहेत. त्यामुळे ही कार्यवाही नागरिकांना दाखवण्यासाठी होती का? यामागे दुसरेच काही कारण आहे, अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे एकूण पोलिसांचे कार्यपद्धती संशयाच्या भवर्यात अडकल्याचे दिसते किंवा पोलिसांचा वचक राहिला नाही का? असे म्हणण्यास वाव मिळतो.
सध्या कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. असंख्य चोर्यांच्या घटना त्याबरोबरच नागरिकांचे खून देखील होत आहे. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासनाकडून नागरिकांनी काय अपेक्षा ठेवाव्यात? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांना येणार्या अडचणींचा विचार करून आपले कर्तव्य बजावताना बेधडकपणे कार्यवाही केली पाहिजे.
त्यामुळे निश्चितपणे पोलिसांची प्रतिमा उजळणार असून पोलिस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण होण्यास मदत होणार आहे. एका बिंगो जुगार चालकावर कारवाई करण्याचा देखावा करून दुसरे बिंगो जुगार चालक राजरोसपणे आपले बिंगो जुगार चालवत आहे. यावरून नागरिकांनी काय बोध घ्यावा, याचा पोलिसांनी खुलासा करणे गरजेचे आहे. पोलिसांनी कोळपेवाडी परिसरातील सर्वच अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. जुगारामुळे तरूणांसह लहान मुलेही वाम मार्गाला लागत असल्याने कारवाई होणे गरजेचे आहे.
हे ही वाचा :