अहमदनगर : घरकुलासाठी आता ओपन, ओबीसींची स्वतंत्र यादी!

अहमदनगर : घरकुलासाठी आता ओपन, ओबीसींची स्वतंत्र यादी!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांमधील इतर संवर्गातून ओबीसी, ओपन व अल्पसंख्याक कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार लाभार्थ्यांची पडताळणी करून 24 जुलैपर्यंत ही यादी तयार करून ती शासनाकडे पाठविली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी घरकुल लाभासाठी उद्दिष्ट वाढतानाच सर्वच घटकांना लाभ मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत घरकुल लाभासाठी आतापर्यंत शासनाने दिलेली यादी विचारात घेतली जात आहे. यात अनुसुचित जाती, जमाती व 'इतर' कुटुंब अशी स्वतंत्र वर्गवारी दिसत होती. यातील 'इतर' या संवर्गात ओपन, ओबीसी, एनटी, व्हिजीएनटी अशा कुटुंबाचा समावेश आहे. मात्र, इतर संवर्गात अनेक घटक समाविष्ट असल्याने घरकुल लाभापासून ते वंचित आहेत. कदाचित, हीच बाब लक्षात घेवून आवास प्लस मधील 'इतर' प्रवर्गातील कुटुंबाची प्रवर्गनिहाय वर्गवारी करणे आवश्यक असल्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

आवास प्लस सर्वेक्षणाअंतर्गत प्राप्त याद्यांमधून राज्यातील सुमारे 28 लाख हे इतर प्रवर्गातील कुटूंबे आहेत. यामध्ये इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक व खुला या प्रवर्गातील कुटुंबाचा समावेश आहे. या याद्या जिल्हानिहाय, तालुका निहाय, व ग्रामपंचायतनिहाय पाठविण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास यंत्रणेकडेही याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

यानुसार, ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व प्रकल्प संचालक सुनील पठारे हे ग्रामपंचायतनिहाय याद्या प्राप्त झाल्याची खात्री करणार आहेत. त्यानंतर ग्रामसेवक व उपलब्ध कर्मचारी यांचेमार्फत इतर प्रवर्गातील याद्यांमधून इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), अल्पसंख्याक प्रवर्ग व खुला प्रवर्ग ही कुटुंबे मार्क करून घेतली जाणार आहेत.

सदर याद्यांमधून ओबीसीची स्वतंत्र यादी तयार होईल. प्रकल्प संचालक पठारे हे ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक यांना इतर मागासवर्ग, सर्वसाधारण आणि अल्पसंख्याक कुटूंब संख्या कळविणार आहेत. दरम्यान, या संदर्भात तात्काळ कार्यवाहीच्या सूचना करण्यात आल्या असून, 24 जुलैपर्यंत ही आकडेवारी कळवावी, असे आदेश शासनाचे उपसचिव का.गो.वळवी यांनी दिलेले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news