हे तळे नव्हे, स्वारगेट एसटी स्टँड ! प्रवेशद्वारावर साचले मोठे तळे | पुढारी

हे तळे नव्हे, स्वारगेट एसटी स्टँड ! प्रवेशद्वारावर साचले मोठे तळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट एसटी स्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच येथील एक मोठी ड्रेनेजलाइन खराब झाली आहे. त्यामुळे येथे शंकरशेठ रस्त्याच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वारावर मोठे तळे साचले आहे. यातून ये-जा करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

याकडे एसटी आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. एसटीच्या पुणे विभागातील सर्वांत मोठे स्थानक म्हणून पुणे स्थानकाची ओळख आहे. स्वारगेट स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशांची राज्यभरात ये-जा असते. आपल्या डोक्यावर, हातात अवजड बॅगा भरून प्रवासी येथे येत असतात. मात्र, स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना गाडीमध्ये बसण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हडपसरच्या दिशेने येणार्‍या शंकरशेठ रस्त्यावरील स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील ड्रेनेज खराब झाल्यामुळे येथे एका पावसातच मोठे पाण्याचे तळे साचत आहे. तसेच, सातारा रस्त्याच्या दिशेने येणार्‍या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच मोठे खड्डे पडले आहेत तर येथेच एक चेंबर खचले आहे. स्थानकातील मुख्य फलाटासमोरदेखील मोठा खड्डा आहे. त्यातही पावसाचे पाणी साचत आहे. तसेच, अन्य ठिकाणीसुध्दा प्रवाशांना खड्डे आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. एसटी अधिकारी म्हणाले की, येथे साचणारे पाणी येथील ड्रेनेजलाइन खराब झाल्यामुळे साचत आहे. त्यासंदर्भात पालिकेला आम्ही अनेकदा पत्रे दिली आहेत. चर्चादेखील सुरू आहेत.

 

Back to top button