

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (दि. 4) अहमदनगर जिल्ह्यातील 29 उपकेंद्रांवर घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पहिल्या पेपरला जिल्ह्यातील 7 हजार 548, तर दुसर्या पेपरला 7 हजार 497 उमेदवार उपस्थित होते.
राज्य शासनामध्ये प्रशासकीय कामकाजासाठी उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, भूमिअभिलेख अधीक्षक, उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधीक्षक अशा विविध पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दर वर्षी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा घेतली जाते. पहिल्यांदा पूर्व व नंतर मुख्य परीक्षा घेण्यात येते.
रविवारी (दि.4) पूर्व परीक्षा झाली. अहमदनगर परीक्षा केंद्रावरील 29 उपकेंद्रांवर 10 हजार 368 उमेदवारांची आसन व्यवस्था होती. परीक्षेच्या व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाने एकूण 954 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केल्याचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी नगर प्रांताधिकारी पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3)लागू केले होते.
हेही वाचा