

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पर्यटन क्षेत्रातील भंडारदरा धरण परिसरातील आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाची खोल दरी असलेल्या सांदण दरीत सुमारे 500 पर्यटक अडकले होते. वन विभागाच्या कर्मचार्यांनी स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
शनिवार, रविवारची सलग सुट्टी असल्याने भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेल्या 'काजवा महोत्सवा'चा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पांजरे, घाटघर, साम्रद व भंडारदरा परिसरात जणू जत्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे. जिकडे-तिकडे पर्यटकांच्या वाहनांची रांग लागलेली पाहावयास मिळत आहे. यातील काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेतला. रविवारी दुपारी सांदणदरीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दरीमध्ये उतरले.
दुपारी अचानक वादळी वार्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाण्याचा ओघ वाढू लागल्याने काही पर्यटक धास्तावले. दरम्यान, गस्तीवर असलेले वनविभागाचे वन संरक्षक महिंद्रा पाटील, दिवे यांना सुमारे 500 ते 600 पर्यटक सांदण दरीत अडकल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ मदत कार्यासाठी धाव घेत स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हेही वाचा