शेवगाव-गेवराई राज्य मार्गालगत आंदोलन; गटविकास अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन

शेवगाव-गेवराई राज्य मार्गालगत आंदोलन; गटविकास अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन

बोधेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते जिल्हा सरहद्द अर्धपिंपरी या चार किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी शुक्रवारी शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गुरेढोरे, बैलगाडी, औत, तिफन आदी अवजारांसह तीन तास ठिय्या आंदोलन केले. शेवगावचे गटविकास अधिकारी रमेश कदम यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सदर रस्त्याची आंदोलक नेत्यांसह पाहणी करून तातडीने या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण होण्यासाठी शेतकर्‍यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तोंडी व लेखी मागणी करूनही प्रश्न मार्गी लागला नाही. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते जिल्हाहद्द अर्धपिंपरी या चार किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठी मशागतीचे साहित्य देखील या रस्त्याने घेऊन जाणे अवघड झाले आहे.

जवळपास दीडशे ते दोनशे शेतकरी, तसेच वयोवृद्ध माणसे दररोज या रस्त्याने ये-जा करतात. याच रस्त्यावर पाटेकर वस्ती, गरड वस्ती, पाथरकर वस्ती, गलधर वस्ती, गायकवाड वस्ती आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब झाला असून, आजपर्यंत एकदाही या रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता दलदलिचा झाला असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

आंदोलनात सर्जेराव घोरपडे, हरिश्चंंद्र घाडगे, मधुकर पाटेकर, बाळासाहेब जाधव, भारत घोरपडे, बाळासाहेब घोरपडे, सरवर शेख, प्रदीप जगताप, शिवाजी हकाळे, तान्हाजी घोरपडे, तुकाराम पाटेकर, पांडुरंग नांदगुरे, सुभाष वैद्य, पोपट जाधव, योगेश गरड, बप्पासाहेब पवार, मुस्तफा शेख, प्रभाकर पाथरकर, महेश पवार, सुधाकर पाटेकर, किशोर वाघुम्बरे, ज्ञानेश्वर वैद्य, दस्तगिर शेख, किशोर गलधर सहभागी झाले होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब मस्के, सहाय्यक अभियंता एस. बी. मोरे, शाखा अभियंता साळवे, तलाठी बाबासाहेब अंधारे, विस्तार अधिकारी डी. बी. शेळके, भोसले उपस्थित होते. बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलिस नाईक ईश्वर गर्जे, कॉन्स्टेबल संदीप मस्के, सचिन हाडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

विनंतीवरून रास्ता रोकोऐवजी ठिय्या

शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार होते. परंतु, गटविकास अधिकारी रमेश कदम यांनी त्यांच्याशी संपर्क करून चर्चेने प्रश्न सोडवू, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतो, रस्ता रोको करून कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख राज्यमार्ग आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतील. रास्ता रोको करू नका, असे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत, रास्ता रोको न करता ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news