

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : मोदी आवास योजनेसाठी जामखेड तालुक्याला ओबीसी प्रवर्गासाठी 202 व एसबीसी प्रवर्गासाठी 1 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार एकूण 203 लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत. या प्रवर्गातील नागरिकांना ग्रामपंचायतीत अर्ज करण्याची मुदत 22 ऑक्टोबरपर्यंत आहे. सर्वांसाठी घरे 2024 हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणार्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या कोणत्याही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे या प्रवर्गासाठी राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.
संबंधित बातम्या :
इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा जास्त नसावे. स्वत:च्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी. अथवा स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण, गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा, असे या योजनेसाठी निकष आहेत.
या लाभार्थ्यांचा होणार समावेश
'ड' यादीतील ओबीसी-एसबीसी लाभार्थी,सिस्टीमद्वारे ऑटोमेटिक रिजेक्ट झालेले परंतु पात्र असलेले ओबीसी-एसबीसी लाभार्थी, या दोन्ही व्यतिरिक्त बेघर अथवा कच्चे घर असणार्या ओबीसी, एसबीसी लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे. लाभार्थ्यांनी या योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतकडे 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे