Pune : आंबेगावला ग्रा.पं. मतदार यादीत घोळ ; अनेकांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही

Pune : आंबेगावला ग्रा.पं. मतदार यादीत घोळ ; अनेकांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मूळ वास्तव्य असलेल्या गावातील, वस्तीवरील व वॉर्डातील अनेक मतदारांचे नाव शेजारच्या गावातील मतदार यादीत गेल्याचे प्रकार घडल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आला नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत घोडेगाव तहसील कार्यालयाने दखल घेऊन मतदार याद्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख कलावती पोटकुले यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली असून, 13 ग्रामपंचायतींची काही सदस्यपदे रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.

या निवडणूक कार्यक्रमात मतदार यादी जाहीर झाल्या असून, अनेक मतदार यादीत घोळ झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या जांभोरी, साकेरी, पालखेवाडी, तळेघर येथे अनेक मतदारांची नावे दुसर्‍या गावातील मतदार यादीत गेल्याचे प्रकार घडले असल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक मतदार नागरिक घोडेगाव तहसील कार्यालय येथे यादी दुरुस्तीसाठी हेलपाटे मारत असून, ग्रामपंचायत निवडणूक विभाग तहसील कार्यालय घोडेगाव येथील अधिकारी कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. केवळ निवडणूक अधिकार्‍यांच्या बेशिस्त कारभारामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने मतदार याद्या तात्काळ दुरुस्त कराव्यात अन्यथा महिला व मतदारांना घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा पोटकुले यांनी दिला आहे.

साकेरी गावची निवडणूक लागली असून, साकेरी गावातील रहिवासी असलेले गोविंद गंगाराम मोहंडूळे हे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांचे नाव तळेकर येथील ग्रामपंचायत यादीत गेल्याने त्यांना अर्ज भरता येत नसल्याने त्यांनी 2017/18 च्या निवडणूक यादीप्रमाणे साकेरी गावातून निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी, याबाबत विनंती अर्ज निवडणूक अधिकारी घोडेगाव येथे दिला आहे. हा सर्व प्रकार सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक लढवू नये यासाठी आहे का ? असा प्रश्न पोटकुले यांनी उपस्थित केला आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती, त्या वेळी त्या गावोगावी लावल्या होत्या. त्या वेळेस मतदारांनी नावे तपासणे गरजेचे होते. सध्या काहीच करू शकत नाही. भविष्यात पुढील निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये काही दुरुस्ती असेल, तर ती आवर्जून करून सहकार्य केले जाईल.
                   – ए. बी. गवारी, आंबेगाव तालुका ग्रा.पं. निवडणूक निर्णय अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news