उघड्या पडलेल्या गणेशमूर्ती पुन्हा केल्या विसर्जित | पुढारी

उघड्या पडलेल्या गणेशमूर्ती पुन्हा केल्या विसर्जित

नानगाव : पुढारी वृत्तसेवा :  नानगाव (ता. दौंड) येथे नुकताच गणेशोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात पार पडला. दहाव्या दिवशी गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला भीमा नदीपात्रात विर्सजित केले. त्या वेळी नदीला पाणी जास्त होते. सध्या नदीतील पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठी विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती उघड्यावर पडल्या होत्या. यामध्ये आवर्जून पुढाकार घेत ग्रामपंचायत प्रशासनाने उघड्या पडलेल्या गणेशमूर्ती गोळा करून पुन्हा या मूर्ती नदीतील खोल पाण्यात विसर्जित केल्या.

संबंधित बातम्या :

गेली काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा झाला. दहा दिवस मनोभावे सेवा करत आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी विसर्जन करत निरोप दिला. नानगाव येथील भीमा नदीकाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. काठोकाठ भरलेल्या नदीत गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. परंतु सध्या येथील नदीतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. काठोकाठ भरलेले पाणी खाली जाऊ लागले आहे. त्यामुळे विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती नदीकाठी उघड्यावर पडलेल्या अवस्थेत होत्या. त्यामुळे माजी सरपंच संदीप खळदकर यांनी पुढाकार घेतला आणि उघड्यावर पडलेल्या मूर्ती गोळा करून या मूर्ती पुन्हा नदीतील खोल पाण्यात नेऊन विसर्जित केल्या. या वेळी उपसरपंच गणेश खराडे, सदस्य विष्णु खराडे, नरेश शेलार, राजेंद्र गुंड व युवकांनी सहकार्य केले. ग्रामपंचायत प्रशासन आणि युवकांनी केलेल्या या कामाचे नागरिकांनी कौतुक केले.

Back to top button