

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत येथे एमआयडीसी उभारण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती, हा केवळ भूलभुलैया आहे, अशी टीका भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, वन विभागाच्या रेहकुरी येथील विश्रामगृहात सोशल मीडियाचे काम करणार्या भाजपच्या सर्व पदाधिकार्यांचा गुणगौरव करणअयात आला. त्या कार्यक्रमातआमदार शिंदे बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, अशोक खेडकर, प्रवीण घुले, सचिन पोटरे, सभापती काकासाहेब तापकीर उपसभापती अभय पाटील, दादासाहेब सोनमाळी, अनिल गदादे, काकासाहेब धांडे, काकासाहेब ढेरे, शेखर खरमरे, सुनील यादव, पप्पूशेठ धोदाड, गणेश पालवे, संभाजी गोसावी उपस्थित होते.
यावेळी आमदार शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नऊ वर्षांमध्ये केलेल्या सर्व विकासकामांची माहिती दिली आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अडीच वर्षांमध्ये मतदारसंघांमध्ये केवळ दहशत निर्माण करण्याचे काम आमदार पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना एमआयडीसी करता आली नाही. आता राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. त्यांनी सुरुवातीला एमआयडीसी मंजूर झाल्याचे सांगितले.
आता मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा देत आहेत. यावरून सर्व काही लक्षात येते. कर्जतला एसटी डेपो मंजूर झाला नाही, यावर बोलताना डेपोपेक्षा नागरिकांना एसटीच्या सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. ज्या परिसरामध्ये एसटी जात नाही, तिथे आपण एसटी सेवा सुरू करू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
आपण मंजूर केलेली विकासकामे आमदार रोहित पवार यांनी बंद पाडली, असा आरोप करीत आमदार शिंदे यांनी कर्जत रस्त्याचा उल्लेख केला. आमदार झाल्यानंतर पुन्हा या कामाला वेग आला आहे. मात्र, मी मंत्री झाल्यास कोणत्याही परिस्थितीत कर्जत शहराला रिंगरोड तयार करणार असून, एकही दुकान काढले जाणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
खासदार विखे तालुक्यात कोणत्याही निवडणुकांच्या प्रचाराला किंवा विकासकामांसाठी येत नाहीत. आपल्यामध्ये काही मतभेद आहेत का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितले, की माझ्यावर पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाला प्रचारात घेण्याची आवश्यकता भासली नाही. बाजार समितीत शिवसेनेच्या नाराजीबद्दल ते म्हणाले, हा विषय छोटासा आहे. तो आम्ही आपसात बसून सोडवू. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
हेही वाचा