

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातील घोटाळ्याची ईडी आणि आयपीएस अधिकार्यांकडून चौकशी सुरू झाल्यामुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारवाई टाळण्यासाठी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह लपेटण्यासाठी येणारे बंदिस्त कफन (बॉडी बॅग) किरकोळ बाजारात 500 ते 1400 रुपयाला मिळते. पण त्याची 6 हजार 700 रुपये म्हणजेच बाजारभावापेक्षा पाचपट जास्त दराने खरेदी, कोरोना काळात नागरिकांसह रुग्णांना पुरवठा करण्यात आलेल्या जेवणाचे कंत्राट, वॉर्ड स्तरावर कोव्हिड सेंटर उभारणी, स्थापत्य, विद्युत कामे, फर्निचर अन्य उपकरणे चढ्या भावाने खरेदी, बंद झालेल्या कोव्हिड सेंटरमधील साहित्य, फर्निचर, उपकरणे भंगार विक्री, तर लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट देण्यासाठी तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा दबाव होता, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी पेडणेकर यांचीही चौकशी होऊ शकते.
या चौकशीमुळे पेडणेकर अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पुरवठा घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यापासून पेडणेकर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. एवढेच नाही तर त्या गेल्या काही महिन्यापासून भूमिगत आहेत. ठाकरे गटावर होणार्या प्रहारला तोफ म्हणून सामोरे जाणार्या पेडणेकर यांनी गप्प राहणे पसंत केले आहे. या घोटाळ्यात आपण व आपले कुटुंब अडकू नये, यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.