Mla Balasaheb Thorat : ..तर साईभक्तांची गैरसोय होऊ देणार का? आ. थोरातांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Mla Balasaheb Thorat : ..तर साईभक्तांची गैरसोय होऊ देणार का? आ. थोरातांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : साई भक्तांच्या सुविधेसाठी वर्षापासून तयार केलेली दर्शनरांग व शैक्षणिक संकुल साईभक्तांसाठी उघडे करणे गरजेचे आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून दर्शन रांगेचे लोकार्पण रोखणे हा भाविक भक्तांवर अन्याय ठरेल, असे सांगत, यापुढेही वर्षानुवर्षे पंतप्रधानांना उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्यास आपण भाविक, भक्तांची गैरसोय होऊ देणार का, असा परखड सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केला आहे.

आ. थोरात यांनी मुख्यमंत्री- उपमुख्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून मोठ्या संख्येने भाविक, भक्त शिर्डीला श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रीसाईबाबांच्या भक्तांना ऊन, वारा, पावसाचा त्रास होऊ नये, दर्शनाची सुविधा सुलभ व्हावी, यासाठी श्रीसाईबाबा संस्थानच्या माध्यमातून दर्शन रांग बांधण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून दर्शनरांग बांधून पूर्ण झाली. आपल्याकडे सुसज्ज दर्शनरांग असतानाही भाविकांना उघड्यावर दर्शनासाठी उभे रहावे लागते, यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशी खंत आ. थोरात यांनी व्यक्त केली. श्रीसाईबाबा संस्थानने विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून सुविधांयुक्त शैक्षणिक संकुल बांधून पूर्ण झाले. यासर्व सुविधा श्रीसाईबाबा संस्थानने उभ्या केल्याचे आ. थोरात यांनी ठणकावून सांगितले.

श्रीसाई मंदिरातील दर्शन रांग व शैक्षणिक संकुलन श्रीसाईबाबा संस्थान च्या निधीतून उभे राहिले. त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून निधी घेतला नाही. असे असताना केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे समजले. याबद्दल आमचे काही म्हणणे नाही, परंतु केवळ पंतप्रधानांना उद्घाटनास येण्यास वेळ मिळत नाही म्हणून नवीन दर्शन रांग व शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण न करणे हे योग्य वाटत नाही. यामुळे स्थानिक राजकीय हस्तक्षेपासह दबावाला बळी न पडता, या सुविधा तातडीने सुरू केल्या पाहिजे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः याप्रकरणात लक्ष घालून, भाविक, भक्तांसाठीच्या सोयी, सुविधा तातडीने सुरू करण्यात याव्या, अशी मागणी आ. बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांचे उपोषण सरकारसाठी भूषणावह नाही

शिर्डीचे ग्रामस्थ भाविक -भक्तांची आपुलकीने काळजी घेतात. असे असताना बरेचदा श्रीसाईबाबा संस्थान प्रशासनाकडून ग्रामस्थांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले जातात. त्यातून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातात. शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्यासह शिर्डीत सर्वपक्षीय ग्रामस्थांचे संस्थान प्रशासन घेत असलेल्या निर्णयांविरोधात उपोषण केले. भाविकांच्यीा सोयीसाठी शिर्डी ग्रामस्थांचे उपोषण भूषणावह नसल्याकडे आ. थोरातांनी लक्ष वेधले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news