Asian Gold Medal : अस्लमच्या रुपात नगरला आशियाई सुवर्णपदक | पुढारी

Asian Gold Medal : अस्लमच्या रुपात नगरला आशियाई सुवर्णपदक

अलताफ कडकाले

अहमदनगर : मूळचा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानचा सुपुत्र अस्लम इनामदारच्या रुपात नगरला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या पुरुष कबड्डी संघात आस्लम सात खेळडूंमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेत जवळपास 30 ते 40 गुणांची कमाई केली आहे. सध्या ठाणे जिल्ह्याकडून खेळणारा अस्लम इनामदार हा कबड्डीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी भारतीय संघात डावी चढाई करणारा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्यासह नाशिकचा आकाश शिंदेही भारतीय संघात असून, असे दोन कबड्डीपटू महाराष्ट्राचे आहेत. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत जवळपास 30 ते 40 गुणांची कमाई केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात इराणचा परावभव करीत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर महिलांच्याही संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या अंमित सामन्यात भारताचा कॅप्टन पवन शेरावत हा चढाई करण्यासाठी गेल्यानंतर तो लॉबीमध्ये गेल्याने शेवटच्या दीड सेकंदात कोणाला बाद ठरवायचे यावरून वाद निर्माण झाला.

यामुळे पंचांनी काहीवेळ सामना थांबविला. प्रो कबड्डीमध्ये शिथिल करण्यात आलेला नियमामुळे हा वाद निर्माण झाला होता. यानंतर पंचांनी नियमानुसार भारताच्या चढाई करणार्‍या खेळाडूबरोबर इराणचे तीन खेळाडू बाद ठरविल्यानंतर सामना पूर्ववत करण्यात आला. शेवटच्या काही सेकंदात भारताच्या खेळाडूने चढाई करत 1 गुण घेतला आणि हा सामना भारताने जिंकत आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अंमित सामन्यात वाद कशामुळे

चढाई करणारा खेळाडू जर लॉबीमध्ये गेला अन् त्याच वेळी त्याला डॅश करण्यासाठी विरोधी संघातील जितके खेळाडू लॉबीमध्ये येतील ते चढाई करणार्‍या खेळाडूंबरोबर बाद ठरविण्यात येतात. हाच नियम जागतिक कबड्डी फेडरेशनने ग्राह्य धरला आहे. परंतु, अलीकडच्या काळात कबड्डीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रो कबड्डीची संकल्पना मांडली गेली. यासाठी हा नियम काहीसा शिथिल केला आहे. यामुळे हा वाद निर्माण झाला होता, अशी माहिती ‘पुढारी’ला नगरचे प्रशिक्षक शंतनू पांडव यांनी दिली.

टाकळीभानमध्ये जल्लोष

अस्लम इनामदारच्या जन्मगावात नगर जिल्ह्यातील टाकळीभानमध्ये (ता. श्रीरामपूर) भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकताच एकच जल्लोष करण्यात आला. या भारतीय संघात अस्लम हा इन सातमधील खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याचा गुरुवारी (दि. 12) टाकळभानमध्ये जंगी सत्कार करण्याचे गावकर्‍यानी नियोजन केले आहे. हा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा

जळगाव : वरणगाव येथे अवैध १८ लाखांचा बायोडिझेलचा टँकर पकडला

Pune Crime : हॉटेल मालकाला एक कोटीचा गंडा; अंडरवर्ल्डला सुपारी देऊन ठार मारण्याची धमकी

Short hand exam : शॉर्ट हँडची परीक्षा आता ऑनलाइनच; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

Back to top button